RHWE अंतर्गत इन्सुली येथे शेतकऱ्यांना PPE किट वापराबाबत प्रात्यक्षिक

इन्सुली : उद्यानविद्या महाविद्यालयातील ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव (RHWE) कार्यक्रमांतर्गत इन्सुली गावात कार्यरत विद्यार्थ्यांनी शेतकरी व ग्रामस्थांसाठी वैयक्तिक संरक्षण उपकरणे (PPE Kit) वापराबाबत प्रात्यक्षिक व जनजागृती कार्यक्रम आयोजित केला.

या कार्यक्रमात कीटकनाशकांची फवारणी करताना PPE किटचे महत्त्व, ते योग्य पद्धतीने घालणे व काढणे, तसेच वनस्पती संरक्षण रसायनांचा सुरक्षित आणि जबाबदारीने वापर करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. PPE किटमध्ये हातमोजे, मास्क, गॉगल, संरक्षणात्मक कपडे, बूट आणि डोक्याचे आवरण यांचा समावेश असून, त्यांचा वापर केल्यामुळे त्वचा, डोळे व श्वसनसंस्थेचा विषारी रसायनांशी होणारा संपर्क कमी होतो. त्यामुळे कीटकनाशकांच्या विषबाधेचा धोका टाळून फवारणी अधिक सुरक्षितपणे करता येते, असे विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे स्पष्ट केले.

या प्रात्यक्षिकाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांमध्ये PPE किटच्या वापराबाबत जागरूकता निर्माण करणे, ते योग्य पद्धतीने वापरण्याचे प्रशिक्षण देणे आणि कीटकनाशकांच्या दुष्परिणामांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सुरक्षित शेती पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करणे हा होता.

कार्यक्रमानंतर शेतकऱ्यांनी PPE किटचे महत्त्व समजल्याचे सांगितले. तसेच PPE किट योग्य पद्धतीने घालणे व काढणे त्यांनी शिकून घेतले असून, भविष्यात कीटकनाशकांची फवारणी करताना त्याचा नियमित वापर करण्याची तयारी दर्शविली.

हा उपक्रम कीटकशास्त्रज्ञ डॉ. संदीप गुरव व विकृतिविज्ञान विभागाचे डॉ. राजेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.

या उपक्रमात साहिल कोकरे, देवेन सावंत, अथर्व गावकर, सुशांत जोशी, रोनक पंकज, जास्विन जैन आणि अभय पाटील या विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग होता. ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाबद्दल समाधान व्यक्त केले.

error: Content is protected !!