बीडच्या मोर्चाआधी WhatsApp चॅट लीक
नेमकी काय आहे लीक झालेली चॅट
बीड: बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधात मुक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सगळ्याच पक्षांचे नेते सहभागी झाले होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही मोर्चात सहभाग नोंदवला, पण या मोर्चावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी आव्हाडांवर आरोप केले आहेत.रुपाली ठोंबरे यांनी सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाड यांचे कथित चॅट व्हायरल केले आहेत.जितेंद्र आव्हाड यांनी बीडच्या मोर्चाआधी कार्यकर्त्यांना चिथावलं असल्याचा आरोपही रुपाली ठोंबरे यांनी केला आहे. तसंच हे चॅट जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यासोबतचे असल्याचा दावा ठोंबरे यांनी केला आहे. तसंच हे स्क्रीनशॉट मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पोलिसांना दिल्याचं रुपाली ठोंबरे म्हणाल्या आहेत.
नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाडांचा पलटवार दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी रुपाली ठोंबरे यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. ‘होणार काहीही नाही, पोलीस यंत्रणा काहीही करणार नाही, हे आम्हाला माहिती आहे. हिमंत असेल तर माझा चॅट हा ओरिजिनल आहे, हे त्या वकिलांनी सिद्ध करून दाखवावं. एक तर मी राजीनामा देईन, नाहीतर त्यांनी माफी मागावी’, असं आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे.’सोशल मीडियावर काम करणारी मुलं फार हुशार असतात, त्यांनी याचाच वापर केला आहे. अख्ख्या महाराष्ट्रभर तो चॅट व्हायरल केला आहे, पार सगळ्या टीव्ही चॅनलला चालू आहे. असा चॅट करायला मी वेडा आहे का? दलित आणि मुसलमानांना कशाला मध्ये खेचता? ते काय पैशांचे हावरट आहेत का? हे जातीपातीचं राजकारण बास करा, याच्यानेच महाराष्ट्राचं वाटोळं झालं. बीडमध्ये याचे पडसाद उमटत आहेत’, असं प्रत्युत्तर जितेंद्र आव्हाड यांनी रुपाली ठोंबरे यांना दिलं आहे.
