लोककलाकार गणपत मसगे याना राजस्थान सरकारचा पुरस्कार

राज्यपालांच्या हस्ते आज उदयपूर येथे पुरस्कार वितरण

असा पुरस्कार मिळवणारे राज्यातले पहिले लोककलाकार

कुडाळ: ठाकर आदिवासी कलाक्षेत्रातील कळसूत्री बाहुल्या व चित्रकथी या कलाप्रकारात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राष्ट्रीय लोककलाकार गणपत सखाराम मसगे यांना राजस्थान सरकार व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक उदयपूर यांच्याकडून दिला जाणारा लाइफटाइम अचीवमेंट कोमल कोठारी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. उदयपूर येथे होणाऱ्या शिल्पग्राम महोत्सवामध्ये या पुरस्काराचे वितरण आज २१ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे.

या अगोदर सिने अभिनेते मिथुन चक्रवर्ती तसेच डॉक्टर प्रकाश घाडगे, विनायक खेडकर यासारख्या दिग्गज कलाकार, अभ्यासकांनी या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. उदयपूर येथे २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या शिल्पकार उत्सवाचे औचित्य साधून या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. शिल्पग्राम महोत्सवासाठी देश विदेशातून खास पर्यटक घेत असतात. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे तसेच पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

राजस्थान येथे राज्यपाल यांच्या हस्ते गणपत सखाराम मजगे यांना या पुरस्काराचे वितरण होणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्यातील कलाक्षेत्रात कार्य करणाऱ्या कलाकारांमधून गणपत मसगे हे महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिले कलाकार आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. मसगे यांनी आपल्या कलाक्षेत्राचा ठसा संपूर्ण भारतभर उमटवला असून त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव आता महाराष्ट्र बाहेरही केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *