लायन्स फेस्टिव्हलची तयारी अंतिम टप्प्यात

सर्व स्टॉल्स फुल ; करमणुकीची जय्यत तयारी

पत्रकार परिषदेत अध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर यांची माहिती

कुडाळ: लायन्स क्लब ऑफ कुडाळ, सिंधुदुर्ग या सेवाभावी संस्थेतर्फे २८,२९, ३० व ३१ डिसेंबर रोजी (रोज सायंकाळी ६.०० नंतर) कुडाळ हायस्कूल, कुडाळच्या भव्य मैदानावर ‘ऑटो-एक्सपो इंडस्ट्रियल-कम-फूड फेस्टिवल’ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी लायन्स क्लब कुडाळ सज्ज झाला आहे. महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सिंधुदुर्गसह मुंबई पुणे कोल्हापूर आदी भागातून सुमारे ९० इंडस्ट्रियल, ऑटो एक्सपो, खाद्यपदार्थ व जनरल स्टॉल्स सहभागी झाले आहेत.अशी माहिती लायन्स क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष ला.चंद्रशेखर पुनाळेकर आणि ला. सीए सागर तेली यांनी दिली.     लायन्स क्लब ऑफ कुडाळ, सिंधुदुर्ग या सेवाभावी संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या २३ व्या लायन्स फूड फेस्टिवलबाबत माहिती देण्यासाठी येथील हॉटेल स्पाईस कोंकण येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी लायन्सचे जेष्ठ पदाधिकारी सीए सुनिल सौदागर, ऍड अजित भणगे, ऍड श्रीनिवास नाईक आनंद बांदिवडेकर,  लायन्स ऑटो एक्स्पो, इंडस्ट्रीयल कम फूड फेस्टिवल अध्यक्ष गणेश म्हाडदळकर, ऍड शेखर वैद्य, डॉ अमोघ चुबे, ऍड मिहीर भणगे, जीवन बांदेकर, सीए शैलेश मुंडये, साईश सामंत, कपिल शिरसाट उपस्थित होते.  

पुनाळेकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा महोत्सव घेण्याची संकल्पना लायन्स क्लब ऑफ कुडाळ, सिंधुदुर्ग तर्फे प्रथमतः जिल्ह्यात १९९८ साली सुरू करण्यात आली होती. .सदरच्या महोत्सवामध्ये सर्व नामांकित ऑटो कंपन्यांच्या गाड्यांच्या वितरकांचे स्टॉल अनुभवण्यास मिळतील व हे ह्या वर्षीच्या महोत्सवाचे खास आकर्षण असणार आहे. या मध्ये एका छताखाली सर्व ऑटोकंपन्यांच्या गाड्यांचे मॉडेल्स उपलब्ध असतील, यामुळे गाडी खरेदीसाठी दुसऱ्या शहरात जाण्याची गरज भासणार नाही. तसेच या महोत्सवात कार्यक्रमाचे सहप्रायोजक सारस्वत बँक यांच्याद्वारे कर्जाबाबतच्या विविध सुविधा देण्यात येणार आहेत. तसेच कार एक्स्चेंज सुविधा पण ठेवण्यात आलेली आहे. जिल्ह्यावासियांना आपली कार खरेदी किंवा एक्स्चेंज एक्सेज करण्याची उत्तम संधी या महोत्सवात मिळणार आहे. याबरोबरच या महोत्सवामध्ये इंडस्ट्रियल व जनरल स्टॉल्स साठी राज्यभरातून हर्बल, आयुर्वेदिक, कॉसमेटिक प्रोडक्ट्स, शेती-घरगुती यंत्र असे विविध प्रकारचे स्टॉल्स मांडण्यात येणार आहेत. या सर्वांसोबतच खवय्यांसाठी मेजवानी म्हणून विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्स देखील उपलब्ध असतील. . फूड-स्टॉल्समध्ये विशेष आकर्षणाचे रुचकर चविष्ट पदार्थ, मराठमोळ्या खाद्य संस्कृतीने भरलेल्या चवदार पदार्थांचा आस्वाद घेण्यास मिळणार आहे. या महोत्सवात कार्यक्रमाचे सहप्रायोजक पाटणकर बंधू यांचे- लक्ष्मी ज्वेलर्स, कुडाळ तसेच सारस्वत बँक यांचे महत्वपूर्ण योगदान लाभले आहे. त्याचबरोबर कुडाळ विधानसभा मतदार संघांचे आमदार निलेश राणे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

दि. २८ डिसेंबर रोजी “लायन्स फेस्टिव्हल” या महोत्सवाचे उद्घाटन हे ‘लायन्स डिस्ट्रिक्ट 3234D1’ चे उपप्रांतपाल लायन विरेंद्र चिखले, आम निलेश राणे, महाराष्ट्र चेबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अँग्रीकल्चर कोंकण रिजन उपाध्यक्ष श्रीकृष्ण परब , महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरचे वेस्टर्न रीजन उपाध्यक्ष रमाकांत मालू  यांच्या उपस्थितीत होणार आहे. २८ रोजी संकल्प क्रीएशन, कुडाळ प्रस्तुत “नृत्यरंग 2024″ हा एक रोमांचक नृत्य महोत्सव आयोजित केला जात आहे. या मध्ये भारतातील शास्त्रीय, लोक नृत्या सोबत पश्चिमी नृत्य कलेचा कलाविष्कार कार्यक्रम सादर होईल. दि.२९ रोजी जलवा २०२४ होणार आहे .दिनांक ३० रोजी सई एंटरटेनमेंट प्रस्तुत जल्लोष २०२४ ” हा डान्स अँड म्युझिकल लाईव्ह कंसर्ट आयोजित केला आहे, या कार्यक्रमात हर्षद मेस्त्री (स्वरकोकण रत्न), स्नेहल गुरव (प्रथितयश पार्श्वगायिका) आणि काश्मीरा सावंत (प्रथितयश पार्श्वगायिका) यांसारखे अद्वितीय आणि प्रतिभावान कलाकार आपल्या मनमोहक गाण्यांच्या सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. तसेच खास आकर्षण म्हणून या दिवशी मराठी चित्रपटअभिनेत्री व नृत्यांगना श्वेता परदेशी हिचा अद्भुत नृत्यांगनेच्या अदाकारीचा अनुभव या वेळी मिळणार आहे.

दिनांक ३१ रोजी सई एंटरटेनमेंट प्रस्तुत Countdown Begins २०२५” डान्स अँड म्युझिकल लाईव्ह कंसर्ट आयोजित केला आहे. या कार्यक्रमात एकत्रितपणे विविध वाद्यकलाकार, गायक आणि नर्तक आपली कला सादर करणार आहेत.असे पुनाळेकर यानी सांगितले  सुप्रसिद्ध गायकांच्या यादीत अनुष्का शिकतोडे (सूर नवा ध्यास नवा फेम), धनश्री कोरगावकर (महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम), गणेश मेस्त्री (इंडियन आयडॉल फेम) आणि हर्षद मेस्त्री (स्वरकोकण रत्न) यांसारखे प्रतिभावन प्रसिद्ध कलाकार आहेत, जे आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहेत.याशिवाय, उत्कृष्ट अभिनेत्री, मॉडेल, नृत्यांगना आणि कोरियोग्राफर मिनाक्षी पोक्षे यांचे नृत्य सादरीकरण देखील असणार आहेत.या चारही दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये निलेश गुरव व बादल चौधरी यांचे बहारदार निवेदन रसिकांना अनुभवण्यास मिळणार आहे .

३१ डिसेंबरच्या रात्री, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी या अद्वितीय महोत्सवात सहभागी व्हा आणि एक अविस्मरणीय अनुभव मिळवा असे लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्ग तर्फे आवाहन करण्यात आले आहे. या चार दिवसातील संस्मरणीय कार्यक्रमाध्या अनुभवाचा भाग बनण्यासाठी सर्व सिंधुदुर्गवासीयांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. जिल्ह्यातील या भव्य लायन्स महोत्सवामध्ये सुमारे ५० हजार लोक भेट देईल अपेक्षा आहे. समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी हा लायन्स महोत्सव उर्जा देणारा, करमणुकीचा व लाभदायक ठरणार आहे.असे लायन सागर तेली यांनी सांगितले. अँड भणगे, अँड नाईक यांनीसुद्धा फेस्टिवलबाबत माहिती दिली दरम्यान गेली २२ वर्षे हा महोत्सव करताना आमचे जेष्ठ लायन्स पदाधिकारी डॉ नंदन सामंत, रमण चव्हाण यांचे फेस्टिवलमध्ये फार मोठे योगदान होते. आज ते आमच्यात नसले तरी त्यांच्या स्मृती सतत आमच्या सोबत आहेत. हा महोत्सव करताना त्यांच्या आठवणीशिवाय हा महोत्सव पूर्ण होऊ शकत नाही असे सीए सुनिल सौदागर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *