राष्ट्रवादीला अर्थ तर मग आम्हाला गृह खातं का नाही?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी कायम
नागपूर : मंत्रीमंडळ विस्तार झाला आमदारांचा शपथविधी सोहळा सुद्धा पार पडला मात्र अजूनही गृहखात्याच्या तिढा सुटलेला दिसत नाही.महायुतीमध्ये आधीच मंत्रिपद न मिळाल्याने नाराज नेत्यांचे सुर उमटत असतानाच आता गृह खात्यामुळे खातेवाटप अधिवेशन संपल्यानंतर होणार की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे.अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस असून, अद्याप खातेवाटप झालेले नाही. त्यामुळे मंत्र्यांना मतदारसंघात बिनखात्याचे मंत्री म्हणूनच जावे लागणार असल्याने नाराजीचा सूर आहे. खातेवाटप कधी असा प्रश्न संबंधित मंत्र्यांना विचारल्यास वरिष्ठांना विचारा, एवढे बोलून अधिकचे बोलणे मंत्री टाळत असल्याने महायुतीत सर्वकाही आलबेल नाही हे स्पष्ट होत आहे. आठ दिवसापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. महायुतीत मंत्र्यांची संख्या ठरली.परंतु, एकमत होऊ न शकल्याने खातेवाटप लांबणीवर पडलेले आहे. गृह खाते शिवसेनेला हवे आहे. भाजप गृहमंत्रिपद देण्यास इच्छुक नसल्याने हा पेच अधिकच वाढलेला आहे. सर्वच मंत्री बिनखात्याचे असल्याने गुरुवारी (ता. १९) मंत्रिमंडळाची बैठक फक्त २० मिनिटात संपली. महायुतीच्या रखडलेल्या खातेवाटपासंदर्भात दोन कारणे आहेत.
खातेवाटप अधिवेशन संपल्यावर?
खातेवाटप लांबण्याचे एक मुख्य कारण म्हणजे अधिवेशन संपल्यानंतर नाताळच्या सुट्ट्या लागणार असल्याने नाराजी व्यक्त करण्यासाठी मंत्र्यांना, कार्यकर्त्यांना फारशी संधी मिळणार नाही. त्यामुळे जे काही करायचे ते अधिवेशन संपल्यानंतर किंवा शेवटच्या दिवशी अशी माहिती आहे. तर दुसरीकडे आज शनिवारी रात्री किंवा रविवारी खातेवाटप जाहीर केले जाईल, अशीही शक्यता आहे.