पुरोगामी महाराष्ट्रात घडलेल्या निंदनीय घटनेप्रकरणी सभागृहात सखोल चर्चा व्हावीः आ. सुनील शिंदे यांची मागणी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील हिर्लोक आंबेडकरवाडी येथील एका घरात नरबळी सारख्या अघोरी आणि घृणास्पद कृत्याच्या तयारीत असलेल्या ५ व्यक्तींना पोलिसांनी बुधवारी अटक केली. या घटनेचे पडसाद आज (गुरुवारी) विधान परिषदेत उमटले. विधानपरिषद आमदार सुनिल शिंदे यांनी नियम २८९ द्वारे याकडे सभागृहाचे लक्ष वेधत पुरोगामी महाराष्ट्रात घडलेल्या या निंदनीय घटनेप्रकरणी सभागृहात सखोल चर्चा करावी, अशी मागणी केली आहे.
पोलिसांनी आंबेडकरवाडी येथील एका राहत्या घरात टाकलेल्या छाप्यात सुमारे ४ बाय ४ लांब आणि ८ फुट खोलीचा खड्डा आढळून आला. तसेच अनिष्ट प्रथेचा वापर करून जादूटोणा करणारे साहित्य आढळून आले. तसेच नरबळीसाठी लागणारे धारदार कोयता व सूरी अशी हत्यारे आढळून आली आहेत. पोलिसांनी आरोपीकडे केलेल्या चौकशीत गृहदोष निवारण्यासाठी आणि मूलबाल होत नसल्याने अघोरी पूजा सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका निष्पाप जीवाचा बळी वाचला आहे. अन्यथा या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नांदोस येथे पैशाच्या पावसाच्या मोहापायी घडलेल्या नांदोस हत्याकांडाची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता होती. महाराष्ट्र नरबळी व अमानुष अनिष्ट व अघोरी प्रकार जादूटोणा प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून अशा प्रकारच्या अघोरी कृत्यात सहभागी असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची तसेच अंधश्रद्धा निर्मूलनासाठी व्यापक स्वरूपात जनजागृती करण्याची नितांत आवश्यकता आहे. पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारच्या निंदनीय घटना सातत्याने घडत असल्याने सदर प्रकरणी सभागृहात सखोल चर्चा होण्याच्या दृष्टीने सभागृहाचे १९ डिसेंबर रोजी होणारे कामकाज स्थगित करण्यात यावे, अशी विनंती त्यांनी सभापती महोदयांना केली. त्यावर विषयाचे गांभीर्य ओळखून सभापती निलम गो-हे यांनी सदर प्रकरणी शासनास निवेदन करण्याचे निर्देश दिले आहेत.