क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी किंवा लाईफ जॅकेट नसलेले प्रवासी होडीत दिसून आल्यास तत्काळ कारवाई
मालवण प्रतिनिधी: मुंबई गेट वे ऑफ इंडियाजवळ एलिफंटा बोट दुर्घटनेत ११ प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.क्षमतेच्या बाहेर बोटीतून माणसांना घेऊन जाणे आणि त्याचबरोबर नेव्ही ची स्टंट बाजी यामुळे हाकनाक पर्यटकांना आपला जीव गमाववा लागला याच पार्श्भूमीवर आता मालवण बंदरावर प्रशासन अधिक अलर्ट झाले आहे. मालवण बंदर जेटी येथून होणाऱ्या किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी होडी वाहतूकीवर बंदर विभागाने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. प्रवासी बोटीच्या क्षमतेनुसार प्रवासी घेऊन प्रत्येक प्रवाशाने लाईफ जॅकेट घातले आहे का? यांची पाहणी दिवसभर सुरु होती. यापुढे अशाचप्रकारे पथक तैनात ठेवून तपासणी केली जाणार असल्याचे बंदर अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.प्रवाशांची सुरक्षा सर्वात महत्वाची असून नियमांचे पालन प्रवासी होडी व्यवसायिकांकडून होते ते अधिक काटेकोरपणे झाले पाहिजे. जर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी किंवा लाईफ जॅकेट नसलेले प्रवासी होडीत दिसून आल्यास त्यावर तात्काळ कारवाई केली जाणार आहे.
बंदर जेटी येथे सीसीटीव्ही लावले जावेत
अशी माहिती बंदर निरीक्षक आर जे. पाटील, सहाय्यक बंदर निरीक्षक अनंत गोसावी यांनी दिली. प्रवासी होडी वाहतूक, वॉटरस्पोर्ट्स, पॅरासेलिंग या सर्वावर बंदर विभागाचे लक्ष असते. दर पंधरा दिवसांनी आढावा बैठका होत असतात. त्यावेळी प्रवासी सुरक्षेच्या सूचना दिल्या जातात. मात्र बुधवारी मुंबई गेट वे ऑफ इंडियाजवळ बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बंदर विभागाने अधिक सावधगिरी ठेवली आहे. मालवण बंदर अधिकारी व कर्मचारी प्रवासी होडी वाहतूक तसेच वॉटरस्पोर्ट्स, पॅरासेलिंग यावर दिवसभर लक्ष ठेवून होते. तसेच बोटिंची कागदपत्रेही परिपूर्ण असावीत. त्याचीही तपासणी केली जाणार असल्याचे बंदर अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रवासी वाहतूक करताना दर निश्चिती करण्यात आली आहे. प्रौढ व मुले यांचे दर निश्चित आहेत. शालेय सहल यांना काही प्रमाणात सवलत आहे. बोटीतील प्रवासी क्षमता निश्चित करण्यात आहे. लाईफ जॅकेट बंधनकारक आहे. या सर्व नियमांचे पालन जसे होते त्याच प्रमाणे व्हावे. असे बंदर अधिकाऱ्यांनी सांगितले.प्रवासी होडी वाहतूकीवर लक्ष ठेवण्यासाठी बंदर जेटी येथे सीसीटीव्ही लावले जावेत अशा काही सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्याबाबत वरिष्ठ कार्यालयाच्या मार्गदर्शनानुसार कार्यवाही केली जाईल असे बंदर निरीक्षक आर. जे. पाटील, सहायक बंदर निरीक्षक अनंत गोसावी यांनी सांगितले.