पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा राबविण्यात यावा

शिक्षण विभागाचे कक्षाधिकारी डी. सी. शिंदे यांचे स्पष्ट निर्देश

मुंबई प्रतिनिधी: शिक्षण विभागाचे कक्षाधिकारी डी. सी. शिंदे यांनी राज्यात पवित्र पोर्टलमार्फत होणाऱ्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा राबविण्यात यावा आणि हा टप्पा राबवत असताना नव्याने येणाऱ्या जाहिरातींसाठी एसईबीसी (सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग) आणि ओबीसी या प्रवर्गातील आरक्षणाच्या लाभ तसेच 10 टक्के रिक्त पदांवर देखील शिक्षक भरती करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या शिक्षण आयुक्तांना दिले आहेत.शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार, बिंदुनामावलीतील त्रुटींबाबत सर्वच जिल्हा परिषदांकडून शिक्षक भरतीच्या 10 टक्के जागा राखून ठेवण्यात आल्या होत्या. या अनुषंगाने जिल्हा परिषदांचे नियुक्ती प्राधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बिंदुनामावली अद्ययावत असल्याबाबत तसेच त्रुटी नसल्याबाबत शहानिशा करून 10 टक्के रिक्त पदभरतीबाबत प्रमाणपत्र घेऊन दुसऱ्या टप्प्यातील भरतीमध्ये रिक्त 10 टक्के पदभरतीचा समावेश करावा.

आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी स्वप्रमाणपत्रामध्ये बदल करण्याची संधी द्या

राज्यातील एसईबीसी प्रवर्गासाठी अधिनियम 2024 लागू करण्यात आला आहे. त्यानुसार नवीन येणाऱ्या जाहिरातीमध्ये एसईबीसी या प्रवर्गाकरिता दिलेले आरक्षण विचारात घेऊन पवित्र पोर्टलवर जाहिराती देण्याबाबत सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांना सूचना देण्यात याव्यात.शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार चालू शिक्षक भरतीमध्ये उमेदवारांनी त्यांच्या स्वप्रमाणपत्रामध्ये खुला व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असा प्रवर्ग नमूद केलेल्या उमेदवारांना सद्यःस्थितीत एसईबीसी प्रवर्गाकरिता असलेले आरक्षण व कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागास प्रवर्गात येणारे आरक्षण प्राप्त होत आहे.त्यामुळे संबंधित उमेदवारांना यापुढील येणाऱ्या जाहिरातीमध्ये प्राप्त होणाऱ्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी स्वप्रमाणपत्रामध्ये बदल करण्याची संधी देण्यात यावी, असे देखील शिंदे यांनी स्पष्ट करण्यात आले आहे.

error: Content is protected !!