पिंगुळीत 25 डिसेंबर पासून पिंगुळी महोत्सव 2024 चे आयोजन

मिस पिंगुळी, लोकनृत्य सह विविध स्पर्धांचे आयोजन

विविध स्टॉल्स आणि आरोग्य शिबीर

कुडाळ प्रतिनिधी: श्री देव रवळनाथ पंचायतन यांच्या आशीर्वादाने तसेच परमपूज्य सद्गुरू समर्थ श्री राऊळ महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पिंगुळी गावात दिनांक 25, 26, 27 डिसेंबर 2024 रोजी पिंगुळी महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात येत आहे. पिंगूळीवासीयांकडून संपूर्ण सिंधुदुर्गवासियांना एक अप्रूप पर्वणी ठरेल असा हा महोत्सव-आयोजित करण्यात येणार आहे. बॅ नाथ पै शिक्षण संस्थेच्या एमआयडीसी येथील क्रीडांगणावर रोज सायंकाळी 6 ते रात्री 11 या वेळेत हा महोत्सव होणार आहे. या निमित्ताने वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

विविध लोककलांचा कार्यक्रम

ढोल ताशाच्या गजरात संत राऊळ महाराज मठापासून ते बॅरिस्टर नाथ पै क्रीडांगण एमआयडीसी कुडाळपर्यंत भव्य दिव्य मिरवणुकीच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने पिंगुळी गावातील विशेष कामगिरी करणाऱ्या नागरिकांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे. पिंगुळी गाव हा ज्या नावामुळे ओळखला जातो तो पिंगळी समाज यासकडून कळसुत्री बाहुल्या, पांगुळ बैल, चित्रकथी यांसारख्या विविध लोककलांचा कार्यक्रम या निमित्ताने सादर होणार आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी 25 डिसेंबर रोजी रांगोळी स्पर्धा आणि मिस पिंगुळी 2024 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा सर्वांसाठी खुली राहील. या कार्यक्रमामध्ये पिंगुळीगावातील कलाकारांचे विविध नृत्यविष्कार, कलाविष्कार, गीताविष्कार सादर केले जाणार आहेत.

हरहुन्नरी गायक, वादक कलाकार यांच्या ऑर्केस्ट्राने होईल

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी 26 डिसेंबर रोजी कार्यक्रमाची सुरुवात गावातील नामवंत गायक, गायिका वादक यांच्या सादरीकरणाने होईल. तद्नंतर राज्यस्तरीय लोककला नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या लोककलांचा नृत्याविष्कार सादर केला जाईल व त्याचा बक्षीस वितरण समारंभ त्याच दिवशी मान्यवरांच्या हस्ते केला जाईल. महोत्सवाच्या अंतिम आणि तिसऱ्या दिवशी 27 डिसेंवर रोजी कार्यक्रमाची सुरुवात पिंगुळी गावातील हरहुन्नरी गायक, वादक कलाकार यांच्या ऑर्केस्ट्राने होईल आणि कार्यक्रमाची सांगता मुंबई येथील जगभर नावाजलेला अभंग रिपोस्ट यांच्या अभंगवाणी सादरीकरणाने होईल.

या महोत्सवाला हिंदी, मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील कलाकार उपस्थित राहणार आहेत. खाद्यपदार्थांचे स्टॉल, घरगुती पदार्थांचे स्टॉल, फोर व्हीलर, टू व्हीलर कंपन्यांचे स्टॉल, बँका ,पतसंस्था शिक्षण संस्था यांचे स्टॉल तसेच छोट्या मुलांसाठी वेगवेगळे फनी गेम्स, आकाश पाळणे , जम्पिंग जॅम, अशा विविध प्रकारच्या खेळांचा सहभाग या महोत्सवात असणार आहे.

बॅरिस्टर नाथ पै क्रीडांगणावर भव्य दिव्य देखावे

या महोत्सवाच्या निमित्ताने गावातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबीर, मोफत व्यवसाय मार्गदर्शन शिबिर त्याच सोबत हा महोत्सव पाहण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन येणाऱ्या प्रेक्षकांसाठी , प्रश्नमंजुषा, मानाची पैठणी , लकी ड्रॉ अशा विविध स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे यात विजयी होणाऱ्या स्पर्धकांना पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. या महोत्सवाच्या निमित्ताने बॅरिस्टर नाथ पै क्रीडांगणावर भव्य दिव्य देखावे तयार केले जाणार आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी पिंगुळी महोत्सव 2024 मध्ये उपस्थित राहून या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी भूषण तेजम – 94211 44949, सचिन सावंत -9422379400, किंवा मयूर लाड – 99608 07828 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *