मुंबई प्रतिनिधी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवार दिनांक ९ डिसेंबर रोजी हरयाणातून विमा सखी योजना लॉन्च केली आहे. या योजनेचा उद्देश देशातील अर्ध्या जनतेला म्हणजेच महिलांना आर्थिक स्वरुपात सशक्त आणि आत्मनिर्भर करणं आहे. या योजनेचा भाग होणाऱ्या महिलांना ‘विमा सखी’ असं संबोधलं जाणार आहे. या महिलांचं काम म्हणजे आपल्या भागातील महिलांना विमा पॉलिसी काढण्यास प्रोत्साहित करणं आणि यासाठी त्यांना मदत करणं हे असणार आहे.
विमा सखी योजना नेमकी काय आहे?
लाईफ इन्शूरन्स कॉर्पोरेशन अर्थात एलआयसीची ही योजना असून याद्वारे इच्छुकांना सुरुवातीला तीन वर्षे ट्रेनिंग दिलं जाणार आहे. याद्वारे त्यांची वित्तीय समज वाढवली जाईल तसंच त्यांना विम्याचं महत्व समजावून सांगण्याची पद्धत शिकवली जाणार आहे. या ट्रेनिंगच्या काळात या महिलांना मानधन देखील देण्यात येणार आहे. ट्रेनिंगनंतर या महिला एलआयसी विमा एजंटच्या रुपात काम करु शकतील. यामध्ये बीए पास असलेल्या महिलांना विकास अधिकारी म्हणजेच डेव्हलपमेंट अधिकारी बनण्याची संधी मिळू शकेल.
विमा सखी बनण्याची पात्रता काय?
• विमा सखी योजनेसाठी केवळ महिलाच अर्ज करु शकतात.
• या महिलांकडं दहावी पास असल्याचं प्रमाणपत्रत असं आवश्यक आहे.
• या योजनेसाठी १८ ते ७० वयोगटातील महिला अर्ज करु शकतात.
• तीन वर्षांनंतरच्या प्रशिक्षणानंतर या महिला विमा एजंटच्या स्वरुपात काम करु शकतील.
विमा सखीसाठीचे नियम काय?
विमा सखी योजनेंतर्गत तीन वर्षांच्या ट्रेनिंगनंतर संबंधित महिला एलआयसी एजंट म्हणून नियुक्त होईल. पण एलआयसीच्या ती नियमित कर्मचारी नसेल. तसंच नियमित कर्मचाऱ्यांचे कुठलेही लाभ या एजंटला मिळणार नाहीत. ज्या महिलांची विमा सखी म्हणून निवड होईल, त्यांना प्रत्येक वर्षी आपला परफॉर्मन्स दाखवावा लागेल.
विमा सखींना किती पैसे मिळणार ?
विमा सखी योजनेशी संबंधित महिलांना तीन वर्षांच्या ट्रेनिंग दरम्यान २ लाखांहून अधिक मानधन मिळेल. यांपैकी पहिल्या वर्षी ७ हजार रुपये, दुसऱ्या वर्षी ६ हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षी ५ हजार रुपये महिन्याला मानधन मिळणार आहे. यामध्ये बोनस किंवा कमिशनचा समावेश असणार नाही. यामध्ये एक महत्वाची अटक अशी आहे की, या महिला एजंट ज्या पॉलिसी विकतील त्या पॉलिसींपैक ६५ टक्के पॉलिसी या पुढील वर्षाच्या शेवटापर्यंत सक्रीय रहायला हव्यात.उदा. एखाद्या महिलेनं वर्षभरात १०० पॉलिसी विकल्या तर त्यांपैकी ६५ पॉलिसी या पुढील वर्षाच्या शेवटापर्यंत अॅक्टिव्ह रहायला हव्यात. याचाच अर्थ असा की महिलांना केवळ पॉलीसी विकायच्याच नाहीत तर त्या चालू राहतील याची देखील काळजी घ्यायची आहे.
विमा सखीसाठी अर्ज कसा कराल?
1. एलआयसीची अधिकृत वेबसाईट किंवा htttps://licindia.in/test2 या लिंकवर क्लिक करुन या योजनेसाठीचा अर्ज भरता येईल.
2. ही लिंक ओपन झाल्यानंतर सर्वात शेवटी Click here for Bima Sakhi या वर क्लिक करा.
3. या ठिकाणी नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि पत्ता या डिटेल भरा
4. जर तुम्ही एलआयसीचे एजंट, डेव्हलपमेंट ऑफिसर, कर्मचारी किंवा मेडिकल एक्झामिनर यांच्याशी संबंधीत असाल तर त्याची देखील इथं माहिती द्या.
5. शेवटी कॅप्चा कोड भरुन सबमिट बटनावर क्लिक करा