पुढील साडेचार वर्षांमध्ये कणकवली शहराचा चेहरामोहरा बदलणार
कणकवलीत उड्डाणपुलाखाली परिसराच्या सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन
कणकवली : नगरपंचायत निवडणुकीत शहरवासीयांनी शहर विकास आघाडीच्या हाती सत्ता दिली. मी नगराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मागील ६ महिन्यांत जनहिताचे निर्णय घेतले. सत्तेचा उपयोग आम्ही जनसेवेसाठी करणार आहोत. पुढील साडेचार वर्षांमध्ये कणकवली शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे उद्दिष्ट आहे. हे साध्य होण्यासाठी जनतेने आम्हाला सहकार्य करावे. नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरात होत असलेल्या विकासकामे दर्जेदार झाली पाहिजेत. ही जबाबदारी ठेकेदारांची आहे. विकासकामांमध्ये निकृष्टपणा आम्ही खपवून घेणार नाही, असे इशारा नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिला.
शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौकातील उड्डाणपुलाखालील जागेत बगीचा साकारणे व सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन पारकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी श्री. ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, न. पं. च्या मुख्यकार्यकारी अधिकारी गौरी पाटील, नगरसेवक रुपेश नार्वेकर, जयेश धुमाळे, संकेत नाईक, लुकेश कांबळे, नगरसेविका सुमेधा अंधारी, दीपिका जाधव, जाई मुरकर, व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष दीपक बेलवलकर, राजन पारकर, विलास कोरगावकर, माजी नगरसेवक प्रसाद अंधारी आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. पारकर म्हणाले, शहरातील उड्डाणपुलाखाली ४४ पिलर आहेत. या पिलरच्या जागेचे न.पं.च्या माध्यमातून सुशोभीकरण केले जाणार आहे. प्रत्येक पिलरच्या सुशोभीकरणासाठी ५० लाख ते १ कोटी खर्च येणार आहे. ४४ पिलरच्या सुशोभीकरणासाठी ४० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. राज्य शासनच्या माध्यमातून या सुशोभीकरणासाठी निधी प्राप्त होईल. त्यानुसार प्रत्येक पिलरचे सुशोभीकरण केले जाईल. स्वच्छ व सुंदर कणकवली शहर बनविण्यासाठी आम्ही अहोरात्र मेहनत घेत आहोत. शहराची नळपाणी यंत्रणा जीर्ण झाली असल्याने ही नळपाणी यंत्रण सक्षम करण्यासाठी ४० ते ५० कोटी रुपये खर्च येणार आहे. शहरात भूमिगत गटार बांधणे, पावसाचे पाणीसाठविण्यासाठी रेन हार्वेस्टिंग प्रकल्प राबविण्यासाठी डीपीआर तयार करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
सुशांत नाईक म्हणाले, कणकवलीच्या सर्वांगीण विकासासाठी शहर विकास आघाडी कटिबद्ध आहे. न.पं.वर आघाडीची सत्ता आल्यानंतर मागील सहा महिन्यांत शहरात विकासाची कामे मार्गी लागली आहेत. शहरातील निम्मेवाडी-सुतारवाडी परिसरात श्री स्वयंभू नमो उद्यान साकारले जात आहेत. या कामाचे भूमिपूजन काही दिवसांपूर्वी झाले. शहरवासीयांनी आघाडीवर विश्वास टाकला आहे. त्यांचा विश्वास सार्थकी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. स्वच्छ व सुंदर कणकवली बनविण्यासाठी आम्ही काम करीत आहोत. या कामासाठी नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
गौरी पाटील म्हणाल्या, कणकवली शहराचा शाश्वत व सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. न. पं. प्रशासनाकडून शहरवासीयांच्या खूप अपेक्षा आहेत. त्या अधिकारी व कर्मचारी निश्चितपणे पूर्ण करतील. शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नगराध्यक्षांसह नगरसेवक जे प्रयत्न करीत आहेत. त्यांना प्रशासनाची निश्चितपणे साथ असणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी नगरपंचायतीच्यावतीने मनोज धुमाळे यांनी संदेश पारकर यांचे स्वागत केले. तर गौरी पाटील यांचे स्वागत ध्वजा उचले यांनी केले.सूत्रसंचालन अभिनेते निलेश पवार यांनी केले. यावेळी नगरपंचायतीच्या अक्षता रोळे, विभव करंदीकर, अमोल भोगले, प्रशांत राणे यांच्यासह अन्य कर्मचारी, अशोक करंबेळकर, तेजस राणे, वैभव मालंडकर, निकीत मुरकर, चंद्रहास उर्फ बबली राणे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर,माजी नगरसेवक उमेश वाळके, शीतल मांजरेकर, हरेश निखार्गे आदी उपस्थित होते.
विस्थापित झालेल्या विक्रेत्यांचे पुनर्वसन करणार
उड्डाणपुलाखाली परिसराच्या सुशोभीकरणाचे काम नगरपंचायतीने हाती घेतले आहे. त्यामुळे या परिसरातील स्टॉलधारक, भाजी, फळ, फुले विक्रेत्यांना हटविण्यात आले. त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी नगरपंचायतीच्या माध्यमातून जुने भाजी मार्केट परिसरात भव्य व्यापारी संकुल उभारण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. हे संकुल उभे राहिल्यानंतर त्याठिकाणी विस्थापित झालेल्या विक्रेत्यांचे पुनर्वसन केले जाईल, असे आश्वासन संदेश पारकर यांनी दिले. कणकवली शहर स्वच्छ व सुंदर बनविण्याबरोबरच विकासत्मक कामे करण्यासाठी जिल्ह््यातील लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.


Subscribe










