दोडामार्गात मद्यधुंद चालकाची मुजोरी

चार ते पाच वाहनांना दिली धडक

जाब विचारणारला बेदम मारहाण

दोडामार्ग : दोडामार्ग शहरातील आठवडा बाजाराच्या गर्दीत रविवारी सायंकाळी एका मद्यधुंद वाहन चालकाने अक्षरशः धिंगाणा घालत चार ते पाच वाहनांना धडक दिली. एवढ्यावरच न थांबता, या प्रकाराबाबत जाब विचारणाऱ्या एका व्यक्तीला संबंधित चालकाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना सायंकाळी ७.३५ वा.च्या सुमारास घडली. या घटनेमुळे बाजार परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दोडामार्गचा आठवडा बाजार हा तालुक्यासह शेजारील गोवा राज्यातील नागरिकांसाठीही प्रमुख खरेदीचे केंद्र मानला जातो. त्यामुळे बाजाराच्या दिवशी शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. अशाच गर्दीच्या वेळी गोवा राज्यातून आलेल्या एका वाहन चालकाने मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत अनेक वाहनांना धडक दिल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या प्रकारानंतर उपस्थित नागरिकांनी चालकाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या चालकाने एका व्यक्तीवर हल्ला चढवत त्याला बेदम मारहाण केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. संतप्त नागरिकांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहित मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित चालकाला ताब्यात घेतले. त्याची चौकशी सुरू असून नेमकी घटना, वाहनांचे नुकसान आणि मारहाणीमागील कारण याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती दोडामार्ग पोलिस ठाण्याकडून देण्यात आली. आठवडा बाजाराच्या दिवशी घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून मद्यधुंद वाहनचालकाविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. त्यामुळे पोलिस या वाहन चालकावर कोणती कारवाई करतात? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.

error: Content is protected !!