दोडामार्ग – विर्डी येथे धबधब्याच्या जलकुंडात युवक बुडाला

जलकुंडाची खोली तब्बल १२ माडांहून अधिक असल्याचा ग्रामस्थांचा अंदाज

दोडामार्ग : तालुक्यातील विर्डी येथे धबधब्याच्या पायथ्याशी असलेल्या खोल जलकुंडात पोहताना कर्नाटकातील धारवाड येथील विजय दोडमणी (वय २३) हा युवक पाण्यात बुडाल्याची घटना घडली. सायंकाळपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. घटनेची माहिती मिळताच दोडामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. दरम्यान, या घटनेमुळे याच ठिकाणी १४ वर्षांपूर्वी घडलेल्या दुर्घटनेची आठवण ग्रामस्थांमध्ये पुन्हा जागी झाली आहे.

धारवाड येथील काही युवक गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास विर्डीत पोहोचले. वझर सखल धबधब्याचे सौंदर्य अनुभवण्यासाठी त्यांनी डोंगरमाथ्यावरील परिसर गाठला. धबधबा पाहून तातडीने परतण्याचा त्यांचा विचार होता. मात्र उंच कड्यावरून कोसळणारे पाणी आणि खाली निर्माण झालेले नितळ पाण्याचे कुंड पाहून काही युवकांनी पाण्यात उतरण्याचा निर्णय घेतला.

यावेळी विजय दोडमणी पोहत असताना अचानक पाण्यात अदृश्य झाला. तो नेमका कशा परिस्थितीत बुडाला? याबाबत कोणालाही स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही. काही वेळाने तो दिसेनासा झाल्याचे लक्षात येताच त्याच्या मित्रांनी आणि तेथे उपस्थित असलेल्या अन्य पर्यटकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यात यश आले नाही.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल वसंत देसाई, बाळकृष्ण धर्णे, पोलीस नाईक मानसी गावडे, तसेच पोलीस शिपाई अभिजित कांबळे यांनी घटनास्थळी भेट देत स्थानिकांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. मात्र कुंडाची खोली आणि संध्याकाळच्या वाढत्या अंधारामुळे शोधकार्यात अडथळे निर्माण होत आहेत.

कुंडाची खोलीच ठरते धोकादायक

वझर धबधब्याखाली तयार झालेले जलकुंड परिसरातील सर्वाधिक खोल कुंडांपैकी एक मानले जाते. त्याची नेमकी खोली किती आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. मात्र ग्रामस्थांच्या अंदाजानुसार ती बारा माडांहून अधिक असावी. त्यामुळे या ठिकाणी पोहणे किंवा पाण्यात उतरणे अत्यंत जोखमीचे मानले जाते.

पर्यटकांना खबरदारीचे आवाहन

पावसाळ्यात वझर धबधबा पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरतो. मात्र खोल जलकुंड, घसरडे दगड आणि अनिश्चित पाण्याचा प्रवाह यामुळे हा परिसर धोकादायक ठरतो. त्यामुळे अशा ठिकाणी आंघोळ किंवा पोहण्याचा मोह टाळावा, असे आवाहन प्रशासन आणि ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!