कणकवलीत गावठी आठवडा बाजाराचा सोमवारी शुभारंभ – हर्षदा वाळके

पालकमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन, पंचायत समितीचा उपक्रम

कणकवली : कणकवली पंचायत समिती आवारात सोमवारी १५ जुलै रोजी गावठी आठवडा बाजाराचा शुभारंभ होणार आहे. पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके यांनी याबाबतची माहिती दिली. पालकमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते या उपक्रमाचा शुभारंभ होईल असेही त्या म्हणाल्या. पंचायत समितीच्या सभापती दालनात हर्षदा वाळके यांनी पत्रकार परिषद घेऊन आठवडा बाजाराची माहिती दिली. यावेळी उपसभापती राजेश (सोनू) सावंत, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश वालावलकर तसेच पंचायत समितीचे सदस्य उपस्थित होते.

सभापती हर्षदा वाळके म्हणाल्या की, राज्य शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासोबतच शेतीमालाचे मूल्यवर्धन व्हावे यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. शाश्वत विकासाच्या संकल्पनेतील ‘गरिबीमुक्ती आणि उपजीविका वृद्धीस पोषक गाव’ या महत्त्वपूर्ण उद्दिष्टातून या गावठी आठवडी बाजाराची संकल्पना साकारण्यात आली आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी थेट बाजारपेठ उपलब्ध करून देणे देणे आणि योग्य दर मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.

उद्घाटनानंतर हा आठवडी बाजार नियमितपणे प्रत्येक शुक्रवारी सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत भरविण्यात येणार आहे. बाजारासाठी आतापर्यंत सुमारे ४० विक्रेत्यांनी नोंदणी केली असून, आणखी विक्रेत्यांसाठीही जागा उपलब्ध ठेवण्यात आली आहे. पंचायत समितीच्या जुन्या इमारतीच्या आवारात आणि प्रांगणात शेड उभारण्यात आले असून स्वच्छतेची आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळ्यातही बाजार सुरळीत सुरू राहणार आहे.

या बाजारात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला भाजीपाला, नगदी पिके, तृणधान्ये तसेच पीठ, मसाले आणि विविध मूल्यवर्धित खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध असतील. याशिवाय रानभाज्या, फूड स्टॉल, गावठी कोंबड्या, अंडी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांनाही बाजारात स्थान देण्यात आले आहे. पंचायत समिती कणकवली आणि स्नेह सिंधू कृषी पदवीधर

संघ यांच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. वाळके म्हणाल्या, नोंदणीकृत विक्रेत्यांसाठी सुरुवातीला गट तयार करण्यात आले असून, सलग काही आठवडे नियमित सहभाग नोंदविणाऱ्या विक्रेत्यांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. स्थानिक विक्रेत्यांना प्राधान्य दिले जाणार असले तरी जिल्ह्यातील इतर भागांतील दर्जेदार उत्पादने असलेल्या विक्रेत्यांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. या उपक्रमामुळे शेतकरी आणि ग्राहक यांच्यात थेट संपर्क निर्माण होऊन दोघांनाही लाभ होईल.

error: Content is protected !!