मा.आ.वैभव नाईक झाले भावूक
जे पदाधिकारी काम करत नाहीत त्या ठिकाणी नवीन पदाधिकारी नेमा
कुडाळ येथील बैठकीत वैभव नाईक यांचे वक्तव्य
कुडाळ प्रतिनिधी: कुडाळ तालुका पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत माजी आमदार वैभव नाईक भावूक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. माझा पराभव हा लढाई करून झाला आहे.पराभव स्वीकारला असून कोणतीही कारणे द्यायची नाहीत. आता पुन्हा एकदा नव्याने आपल्याला सुरुवात करायची आहे, असे प्रतिपादन यांनी यावेळी केले. कुडाळ तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक माजी आमदार नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
सर्व जनतेसाठी पुन्हा एकदा उभा राहणार
यावेळी माजी आमदार नाईक म्हणाले, “सर्वांनी लढाई केली आणि पराभव झाला आहे. मी पराभवाची कारणे शोधत बसलो नाही. पराभव स्वीकारला आहे. माझ्यासाठी संघर्ष नवीन नसून तो मी नेहमीच करत आलो आहे. आता पुन्हा एकदा नव्याने आपल्या सर्वांना सुरुवात करायची आहे. या मतदारसंघाने मला दोन वेळा आमदार केले. आताही ७२ हजार लोकांनी मतदान केले असून या सर्व जनतेसाठी पुन्हा एकदा उभा राहणार आहे. सर्वांचे प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू. जे शेवटपर्यंत राहतील त्यांच्यासाठी काम करत राहनार आहे.नाईक पुढे म्हणाले, “आता मी आमदार नाही आहे. त्यामुळे मला कोणीही आमदार म्हणून हाक मारू नका. वैभव नाईक या नावाने हाक मारली तरी चालेल. कारण पदे ही येतात, जातात व ती काही कायमस्वरूपी नसतात आणि मी आमदारकी मिरवायची म्हणून कधीही मिरवली नाही. दुसऱ्या पक्षात येण्यासाठी मला अनेक प्रलोभने दाखवण्यात आली; परंतु आम्ही आमच्या पक्ष नेतृत्वाशी, पक्षाशी ठाम राहिलो. जे निवडून आले आहेत, त्यांना मी या अगोदरच शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी चांगले काम करावे. जनतेचे प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी मी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरणार आहे.
जे पदाधिकारी काम करत नाहीत त्या ठिकाणी नवीन पदाधिकारी नेमा
पक्ष संघटना वाढीबाबत बोलताना ते म्हणाले, “जे पदाधिकारी काम करीत नाहीत त्या ठिकाणी नवीन पदाधिकारी नेमण्यात यावेत.” पडते म्हणाले, “मतभेद बाजूला ठेवून एकसंध राहा. सर्व कामे ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून झाली. सर्व गावागावांत नाईक पोहचले आहेत. त्यामुळे आपली ताकद तशीच ठेवा. यापुढे यश आपलेच आहे.” परब यांनी आ. वैभव नाईक हे सर्वांच्या मनातील आमदार आहेत. आता थांबून चालणार नाही, तर वेळप्रसंगी अन्यायाच्या विरोधात रस्त्यावर उतरणेही गरजेचे आहे.”
यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, महिला जिल्हा संघटक श्रेया परब, कुडाळ शहरप्रमुख संतोष शिरसाठ, तालुकाप्रमुख राजन नाईक, माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, तालुका संघटक बबन बोभाटे, महिला आघाडी तालुकाप्रमुख स्नेहा दळवी, मथुरा राऊळ, योगेश धुरी, कुडाळ महिला शहरप्रमुख मेघा सुकी तसेच ठाकरे शिवसेनेचे तालुक्यातील पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना, शिवसेना सेलचे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच सर्व शिवसैनिक उपस्थित होते.













