सिंधुदुर्गात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

दोन पंपांवरील पुरवठा उद्यापर्यंत सुरळीत होणार, पुरवठ्यावर प्रशासनाचे सातत्याने लक्ष

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलच्या उपलब्धतेबाबत नागरिकांनी कोणतीही चिंता करण्याचे कारण नसून इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा पुरवठा कार्यालयाने दिली आहे. जिल्ह्यातील सर्व ६३ पेट्रोलपंपांवर पेट्रोलचा एकूण साठा ५ लाख ४३ हजार ५६६ लिटर तर डिझेलचा साठा ३ लाख ८० हजार ७६१ लिटर इतका उपलब्ध आहे. इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने प्रभावी नियोजन केले असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.

जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील १४ पेट्रोलपंपां पैकी दोन पेट्रोलपंपांवर पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधनांच्या उपलब्धतेसंदर्भात तात्पुरती अडचण निर्माण झाली असली, तरी उर्वरित १२ पेट्रोल पंप नियमितपणे सुरू आहेत. संबंधित कंपन्यांकडून या दोन पंपांसाठी टँकर लोड करण्यात आले असून उद्यापर्यंत पुरवठा पूर्ववत होईल, अशी माहिती विक्री प्रतिनिधी आणि डेपो व्यवस्थापकांनी जिल्हा पुरवठा कार्यालयाला दिली आहे.

पेट्रोल-डिझेलचा पुरवठा अखंडित राहावा यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL), इंडियन ऑईल (IOCL) आणि भारत पेट्रोलियम (BPCL) या प्रमुख तेल कंपन्यांच्या डेपो व्यवस्थापक आणि विक्री प्रतिनिधींशी सातत्याने संपर्क ठेवून पुरवठा साखळीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. कोणत्याही भागात इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक समन्वय साधण्यात येत असून मागणीनुसार पुरवठा सुनिश्चित केला जात आहे.

याशिवाय, कृत्रिम टंचाई, इंधन साठेबाजी किंवा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाने तालुकास्तरावरील भरारी पथके सक्रिय केली आहेत. पेट्रोलपंपांची नियमित तपासणी, पाहणी आणि आवश्यकतेनुसार छापे टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणताही गैरप्रकार आढळल्यास संबंधितांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.

जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोलपंपांवर इंधन वितरण नियमितपणे सुरू असून पुरवठा व्यवस्थेत कोणताही मोठा अडथळा नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावरील किंवा अन्य माध्यमांतील अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये तसेच घाबरून जाऊन अतिरिक्त इंधन साठा करण्याचे टाळावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि तेल कंपन्यांशी राखलेल्या प्रभावी समन्वयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इंधन पुरवठा व्यवस्थापन सक्षमपणे सुरू असून नागरिकांना आवश्यक इंधन उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे.

error: Content is protected !!