कलमठ येथे कथित धर्मांतराचा प्रयत्न उघडकीस

संबंधित धर्मप्रचारक पोलिसांच्या ताब्यात

संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी

कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांची मागणी

कणकवली : कणकवली तालुक्यातील कलमठ गुरववाडी येथे कथित ख्रिश्चन धर्मांतराचा प्रयत्न ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे रविवारी सकाळी उघडकीस येऊन रोखण्यात आला. या घटनेदरम्यान ग्रामस्थ व धर्मप्रचारकांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक तेजस नलवडे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संबंधित धर्मप्रचारकांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर वातावरण शांत झाले. ग्रामस्थांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.

यावेळी सरपंच संदीप मेस्त्री, भाजपा तालुका पदाधिकारी मिलिंद मेस्त्री, माजी उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, विजय चिंदरकर, अनुप वारंग, परेश आचरेकर, समर्थ कोरगावकर, पप्पू यादव, सदानंद चव्हाण, विनय गुरव, सागर पवार, प्रणय शिर्के, सुरज लोके, प्रसाद देसाई यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामस्थांनी धर्मप्रचारक अतुल भोरे व उषा भोरे यांना जाब विचारताना, “येथे येऊन एका धर्माचा प्रचार का करता? खोटी अमिषे दाखवून गोरगरीब लोकांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न होत आहे का?” असा सवाल उपस्थित केला. सरपंच संदीप मेस्त्री व स्वप्नील चिंदरकर यांनी अशा प्रकारांविरोधात कडक कारवाईची मागणी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, बाहेरील काही व्यक्ती गावात येऊन स्थानिकांना प्रलोभने देत धर्मांतरासाठी प्रवृत्त करत असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली होती. त्यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येत संबंधितांना थांबवले व पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्षता घेतली.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक सागर कांबळे, हवालदार सुधीर घारकर, किरण कदम, सागर जाधव, श्रीकांत महामुनी तसेच महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी सरपंच संदीप मेस्त्री यांनी केली आहे.

error: Content is protected !!