बाव–तळगाव परिसरात बेकायदेशीर वाळू उत्खनन

“रेल्वे पुलाखाली वाळू उपसा; प्रशासनाची डोळेझाक ?

कुडाळ : बागवाडी, बांव तसेच तळगाव परिसरातील कर्ली नदीमध्ये रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अनधिकृत उत्खननामुळे नदीचे पात्र अतिशय खोल आणि धोकादायक बनले असून, याचा थेट परिणाम स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेवर होत आहे.

स्थानिकांच्या मते, नदीतील वाढत्या खोलीमुळे अनेक अपघात घडले असून, काही नागरिकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. याशिवाय नदीकिनारी असलेल्या जमिनीची मोठ्या प्रमाणावर धूप होत असून, माड व इतर झाडे उन्मळून नदीत कोसळत आहेत. यामुळे शेती आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहे.

अधिक चिंताजनक बाब म्हणजे, या बेकायदेशीर वाळू उत्खननाचा फटका रेल्वे पुलालाही बसण्याची शक्यता आहे. पुलाच्या हद्दीतही वाळू काढली गेल्याने भविष्यात रेल्वे वाहतुकीस मोठा धोका निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारच्या बेफिकीर कृत्यांमुळे केवळ पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही, तर मानवी जीवितालाही धोका निर्माण होतो आहे.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप केला आहे. काही व्यक्तींच्या आर्थिक फायद्यासाठी हजारो लोकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!