‘श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग’ आयोजित गायन स्पर्धांचे करणार परीक्षण
पं. मुकुंद मराठे हे शास्त्रीय – नाट्य संगीत गायक, गायक नट, कार्यक्रम निर्माता, तबलावादक, संवादक, लेखक, खगोल अंतराळ तज्ञा, म्हणून ज्ञात असून, आग्रा, ग्वाल्हेर,जयपूर, गायकीचे घरंदाज गायक संगीतभूषण पं राम मराठे ह्यांचे ते सुपुत्र आहेत. स्वतः उत्तम शास्त्रीय संगीत गायक असून आम रागांबरोबरच आपल्या परंपरेचे अनवट व जोडराग ते अतिशय लीलया पेश करतात। मराठी संगीत रंगभूमीवरील गायक नट ,संगीत मार्गदर्शक, नाट्य दिग्दर्शक म्हणूनही ते परिचित आहेत. ते आकाशवाणीचे A GRADE श्रेणी मान्यताप्राप्त कलाकार आहेत.
सोबतच ते एक उत्तम तबलावादक आहेत. संगीत नाटकांना व शास्त्रीय संगीत कार्यक्रमांना तबला साथसंगतही त्यांनी केली आहे। संगीता व्यतिरिक्त खगोल अंतराळतज्ज्ञ – वैज्ञानिक म्हणून ते सर्वश्रुत आहेत. मुंबई विद्यापीठासह नेहरू प्लेनोटेरियम वरळी येथे त्यांनी खगोल व्याख्याता म्हणून काम केलेले आहे.
असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व उद्या सिंधुदुर्गात येत असून श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग आणि स्वयंभू कला क्रीडा मंडळ आजगाव आयोजित ‘शास्त्रीय गायन स्पर्धा’ व ‘सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा’ या स्पर्धांचे ते परीक्षण करणार आहेत. या स्पर्धा दिनांक 25 व 26 एप्रिल रोजी श्री देव वेतोबा मंदिर आजगाव येथे संपन्न होत आहेत. यावेळी उपस्थित संगीत प्रेमींना ते मार्गदर्शनही करणार आहेत. शिवाय त्यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रमही होणार आहे. तरी सर्व संगीत प्रेमींनी यावेळी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


Subscribe










