वैभववाडी प्रतिनिधी :फळबागायतदार संघाने काजू अनुदान योजनेला मुदतवाढीची मागणी केली होती. दरम्यान काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबवत असलेल्या काजू अनुदान योजनेला महाराष्ट्र राज्य काजू मंडळाने ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनाही आता अर्ज करता येणार आहेत.
हजारो शेतकरी वंचित राहिल्यामुळे .बदलत्या वातावरणामुळे काजू उत्पादक संकटात आला आहे. एकीकडे उत्पादन कमी आणि दुसरीकडे काजू बीला अपेक्षित दरदेखील नाही, यामुळे काजू उत्पादकांनी आक्रमक भूमिका घेतली. अनेक आंदोलने विविध पातळ्यांवर केली. फळबागायतदार संघाने गेले वर्षभर आंदोलन केल्यानंतर राज्याने त्यांच्या मागण्यांपैकी काजू उत्पादकांना अनुदान देण्याची मागणी मान्य केली.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी शासनाने काजू उत्पादकांसाठी दोन हेक्टर आणि दोन हजार किलो मर्यादेत प्रतिकिलो १० रुपये अनुदान योजना जाहीर केली. प्रत्यक्षात या योजनेच्या अंमलबजावणीला विलंब झाला. शासन निर्णयात जाचक अटी असल्यामुळे त्या रद्द करून योजना राबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. त्यानंतर काही अटी शिथिल करून योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली.













