बांदा येथे भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक

युवक गंभीर जखमी

बांदा : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून, रविवारी सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास सटमटवाडी तपासणी नाक्यानजीक एका भीषण अपघाताची घटना घडली. बांदा येथील हेरंब हॉटेल परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत आदेश पेडणेकर (वय २८, रा. बांदा) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

अपघाताच्या सविस्तर तपशिलानुसार, आदेश पेडणेकर हे आपल्या दुचाकीने बांदा येथून गोव्याच्या दिशेने जात होते. हेरंब हॉटेल परिसरात पोहोचल्यानंतर त्यांना एक फोन आला, ज्यामुळे त्यांनी आपली दुचाकी सुरक्षितरीत्या रस्त्याच्या साईडपट्टीवर उभी केली आणि ते फोनवर बोलत थांबले होते. याच दरम्यान, पाठीमागून गोव्याच्या दिशेने अत्यंत भरधाव वेगाने येणाऱ्या मारुती एस-प्रेसो कारवरील चालकाचा ताबा सुटला. चालक तिरुमल्लेश्वर लोकप्पा गौडा (रा. कर्नाटक) याच्या ताब्यातील या कारने उभ्या असलेल्या आदेश यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की आदेश गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने धाव घेत जखमी आदेश यांना बांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने आणि दुखापत गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोव्यातील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याप्रकरणी चैतन्य पेडणेकर यांनी बांदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास बांदा पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!