आमदार स्थानिक विकास कार्यक्रम

१५ कोटींच्या निधीतून २६५ कामांना चालना, १४.४५ कोटी खर्च

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत महत्त्वपूर्ण कामे पूर्ण झाली आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत कणकवली विधानसभा मतदार संघाचे सदस्य नितेश राणे, सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे सदस्य दीपक केसरकर व कुडाळ विधानसभा मतदार संघाचे सदस्य निलेश राणे अशा तीन विधानसभा सदस्यांना प्रत्येकी ५ कोटी रुपये प्रमाणे एकूण १५ कोटी रुपयांचा विकास निधी उपलब्ध झाला होता. या निधीतून विविध विकासकामांना गती देत एकूण २६५ कामांना मंजुरी देण्यात आली आहे. रस्ते दुरुस्ती, सार्वजनिक सुविधा, पाणीपुरवठा, शैक्षणिक व सामाजिक पायाभूत सुविधा यांसारख्या विविध क्षेत्रांतील कामांचा यात समावेश आहे. मंजूर कामांसाठी एकूण १५ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, वितरित निधीपैकी तब्बल १४ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी प्रत्यक्ष कामांवर खर्च करण्यात आला असून, निधीच्या वापराचे प्रमाण समाधानकारक असल्याचे दिसून येते. त्यामुळे विकासकामांना वेग मिळाला असून नागरिकांना त्याचा थेट लाभ होत आहे.
विधानसभा सदस्यांच्या पुढाकारामुळे आणि प्रशासनाच्या काटेकोर नियोजनामुळे निधीचा प्रभावी वापर होत आहे. उर्वरित कामेही लवकरात लवकर पूर्ण करून जिल्ह्याच्या विकासाला आणखी चालना देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

error: Content is protected !!