दररोज २० लाख लिटर पाणीपुरवठा सुरूच – संदेश पारकर
कणकवली : शहरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून, कणकवली नगरपंचायतीच्या नळ योजनेद्वारे दररोज सुमारे २० लाख लिटर पाणीपुरवठा नियमितपणे केला जात आहे. सध्या उन्हाळ्याचा कालावधी सुरू असला तरी शहरात कोणतीही भीषण पाणीटंचाई निर्माण होणार नसल्याचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सांगितले आहे. कणकवली नगरपंचायतीत माध्यमांशी ते बोलत होते. यावेळी नगरसेवक जयेश धुमाळे उपस्थित होते.
पुढे श्री. पारकर म्हणाले, उन्हाळ्यातील वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर नळ योजना सक्षम पद्धतीने चालवण्यासाठी नगरपंचायत कटिबद्ध आहे. पाणीटंचाईबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांमध्ये कोणतेही तथ्य नसून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये. दरम्यान, शिवडाव धरणाचे पाणी १ एप्रिलपासून गड नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. तसेच शिवडाव धरणातून सोडण्यात येणारे पाणी गडनदी पात्रामार्गे आठ दिवसांत कणकवलीतील गडनदीवरील जॅकवेलपर्यंत पोहोचणार असून त्यानंतर शहरातील पाणीपुरवठा अधिक सुरळीत व पाणीपुरवठा मुबलक प्रमाणात सुरू राहणार आहे. नदीपात्रातील पाणी उन्हाळ्यात नैसर्गिक कारणांमुळे कमी होत असल्याचेही श्री. पारकर म्हणाले.
त्याचप्रमाणे उन्हाळ्यात होणारे बाष्पीभवन, पाणी जमिनीत झिरपणे आदी प्रक्रिया दरवर्षी होत असल्याने नदी पात्र कोरडे होते, मात्र यामुळे पाणीटंचाई होणार नाही, असेही ते म्हणाले.
त्याचप्रमाणे जलसंपदा विभाग आणि कणकवली नगरपंचायत यांच्यात पाणी आरक्षणाचा करार झालेला असून त्याअंतर्गत दरवर्षी १२ लाख रुपये पाणीपट्टी भरली जाते. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत कोणतीही अडचण उद्भवणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी अमोल चोपडे, पद्माकर पाटील व श्री. माणगावकर यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती नगराध्यक्ष पारकर यांनी दिली.


Subscribe









