आईला वाचवण्यासाठी मुलगा पुढे सरसावला असता त्याच्यावरही वार करण्याचा प्रयत्न
मुलगा थोडक्यात बचावला
सावंतवाडी : वादातील असलेल्या जमिनीत सरपण गोळा करत असल्याचे मोबाईल चित्रीकरण करण्यास मज्जाव केल्याच्या रागातून सख्या काकाच्या मुलाने पोटच्या मुलासमोरच आईवर कोयत्याने सपासप वार करून तिची निघृण हत्या केली. सरस्वती धोंडी सावंत असे त्या महिलेचे नाव आहे. या खळबळजनक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पोलिसांनी याप्रकरणी मृत महिलेच्या दिराला (काका) आणि पुतण्याला (भाऊ) ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओवळीये येथील सर्व्हे नंबर ३८ वरील जमिनीवरून गेल्या काही वर्षांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. रविवारी दुपारी सरस्वती या शेतात सरपण गोळा करण्यासाठी आपला मुलगा एकनाथ यांच्या समवेत गेल्या होत्या. यावेळी तिथे आलेल्या नातेवाईकांनी मोबाईलवर चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. मुलाने त्यांना हटकले आणि शूटिंग करू नका असे सांगितले. याच गोष्टीचा राग मनात धरून संशयित रघुनाथ विजय सावंत याने हातात कोयता घेऊन थेट सरस्वती यांच्यावर हल्ला चढवला. हा हल्ला इतका भीषण होता की, मुलाच्या डोळ्यादेखत आरोपीने सरस्वती यांच्या मानेवर, पाठीवर आणि डोक्यावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या सरस्वती यांचा रक्ताच्या थारोळ्यात जागीच मृत्यू झाला. आईला वाचवण्यासाठी मुलगा पुढे सरसावला असता त्याच्यावरही वार करण्याचा प्रयत्न झाला, मात्र तो थोडक्यात बचावला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवून विजय कृष्णा सावंत आणि रघुनाथ विजय सावंत यांना ताब्यात घेतले आहे.
एका जमिनीच्या तुकड्यासाठी सख्ख्या नातेवाईकांनीच रक्ताचे नाते विसरून एका महिलेचा बळी घेतल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून घटनेचा पंचनामा पूर्ण करण्यात आला आहे. दरम्यान याबाबतची माहिती मिळाल्या नंतर पोलीस उपाधीक्षक नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली व अधिक माहिती जाणून घेतली. या प्रकरणी काका व पुतण्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून कसून चौकशी सुरू आहे.


Subscribe










