साटेली-भेडशी येथे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील साटेली-भेडशी येथे मंगळवारी सकाळी झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात गोव्यातील एका ५३ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. औषधोपचारासाठी येत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. याप्रकरणी दोडामार्ग पोलिसांनी दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मंगळवार दिनांक २४ मार्च २०२६ रोजी सकाळी ७:०० वाजण्याच्या सुमारास जोआओ बावतीस डिसोजा (वय ५३, रा. पिर्लेन-बार्देश, गोवा) हे आपल्या अॅक्टिवा गाडीने (GA 03 AF 7514) गोव्याहून भेडशी येथे औषधोपचारासाठी येत होते. यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या होंडा शाईन (MH 07 Y 8053) वरील चालक पांडुरंग अनिल दळवी (वय २३, रा. घोटगे-येळपेवाडी) याने आपली गाडी भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवून डिसोजा यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या धडकेत जोआओ डिसोजा यांना गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. याप्रकरणी मयताचा भाचा जॉन मार्सेलो ब्रागांनझा (वय २४, रा. गोवा) याने दोडामार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोडामार्ग पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पांडुरंग दळवी याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे यात निष्काळजीपणामुळे मृत्यू कारणीभूत ठरणे व जीव धोक्यात घालणारी कृती करणे व धोकादायक रितीने वाहन चालवणे. वेगाच्या मर्यादेचे उल्लंघन आदीचा समावेश आहे

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास हवालदार देसाई (HC/711) करत आहेत.

error: Content is protected !!