✒️ चिन्मय श्रीराम घोगळे : प्रतिबिंब
गेल्या २४ दिवसांपासून अमेरिका, इस्रायल व इराण यांच्यात जोरदार युद्ध चालू आहे. ज्याचे परिणाम सध्या जगभरात जाणवू लागले आहेत. युद्धामुळे या देशांमधील वातावरण सध्या चांगलेच तापले असून याचे चटके सध्या भारतामध्ये देखील जाणवू लागले आहेत. भारतामध्ये सिलिंडरच्या किमतीमध्ये वाढ झाली असून काही ठिकाणी तर सिलिंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे. युद्धाच्या या गरमीत अनेकांच्या घरच्या चुली थंड पडतात की काय ? अशी भीती सध्या व्यक्त होत आहे. एकंदरीत युद्धाचा परिणाम गॅस, इंधन, पेट्रोल यांच्या पुरवठ्यावर होऊ शकतो. असे झाल्यास इंधनाचा तुटवडा निर्माण होऊन त्यांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. परिणामी इतर वस्तूंच्या किंमती वाढून महागाई वाढू शकते. शिवाय इतर राष्ट्रांनी या युद्धात उडी घेतल्यास तिसऱ्या महायुद्धाचा धोका उद्भवू शकतो. असे झाल्यास अत्याधुनिक अण्वस्त्रांच्या वापरामुळे संपूर्ण जगाला याचे भयानक परिणाम भोगावे लागतील. असे म्हणतात “युद्धात जो हरतो तो मरतो आणि जो जिंकतो तो बरंच काही हरतो”. अर्थात या युद्धाचे परिणाम ‘पराभूत आणि जेत्या’ अशा दोन्ही राष्ट्रांना भोगावे लागणार आहेत. कारण या युद्धात पराभूत झालेल्या राष्ट्राचे अस्तित्वच संपणार आहे. तर विजयी झालेल्या राष्ट्राला पुन्हा नव्याने आपलं अस्तित्व उभं करावं लागणार आहे. युद्धामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या भीषण परिणामांपासून जगाला एकच मंत्र वाचवू शकतो तो मंत्र म्हणजे “वसुधैव कुटुंबकम्”
वसुधा (पृथ्वी) एव (हेच) कुटुंबकम् अर्थात जग हेच कुटुंब असे मानून आपण चाललो तर काही महिन्यातच याचे सकारात्मक परिणाम जाणवू लागतील. कारण जगातील जवळपास सर्व समस्या मुळापासून नष्ट करण्याची ताकद “वसुधैव कुटुंबकम्” या एका मंत्रामध्ये आहे. हा मंत्र आचरणात आणल्यास जगातील प्रत्येक व्यक्ती आपल्या कुटुंबाचा सदस्य वाटू लागेल. इतरांच्या समस्या त्यांची दुःख आपली वाटू लागतील. सर्वांनी एकत्र येऊन सोडवल्यामुळे समस्या देखील नष्ट होतील. तसेच दुःख देखील काही अंशी कमी होण्यास मदत होईल. गरीब – श्रीमंत, उच्च – नीच असे भेदभाव नाहीसे होऊन एकात्मतेची भावना निर्माण होईल. यामुळे श्रीमंत माणूस आपल्या संपत्तीचा उपयोग स्वतःपुरता न करता इतरांच्या भल्यासाठी करेल. पैशांमुळे उद्भवणाऱ्या समस्या कायमच्या मिटतील. रात्री कोणीही उपाशीपोटी झोपणार नाही. प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक गरज पूर्ण होईल.
चोरी, हाणामाऱ्या इत्यादी गोष्टी थांबतील. कारण आपल्याच कुटुंबात कोणीही चोरी करणार नाही. शिवाय आपल्याच कुटुंबियांवर कोणीही हात उचलणार नाही. परिणामी वाढत चाललेले गुन्हे थांबतील. त्यामुळे पोलीस स्टेशन, कोर्ट – कचेऱ्या यामध्ये होणारा वायफळ खर्च आणि वेळ सत्कारणी लागेल.
देशात आज प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार वाढला आहे. बऱ्याचदा व्यक्तीच्या हतबलतेचा फायदा घेऊन त्याची आर्थिक फसवणूक केली जाते. अनेक शासकीय कार्यालयांमध्ये आजही भ्रष्टाचार चालतो. “वसुधैव कुटुंबम्” या एका मंत्रामुळे स्वतःच्या कुटुंबियांकडून कोणीही लाच स्वीकारणार नाही त्यामुळे आपसुकच भ्रष्टाचाराला आळा बसेल.
देशामध्ये सध्या धार्मिक व जातीय तेढ वाढत चालले आहे. त्यामुळे अनेकदा दंगली व दहशतवादी करावया होण्याची भीती असते. यापूर्वी आजवर अनेक निष्पाप व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. शिवाय देशाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले ते वेगळेच. या गोष्टी नियंत्रणात आणण्यासाठी सरकारला आपली सगळी ताकद पणाला लावावी लागते. वसुधैव कुटुंबकम् या एका मंत्रामुळे आपापसात भाईचारा निर्माण होऊन राष्ट्राच्या युवाशक्तीचा उपयोग राष्ट्रहितासाठी करता येईल.
आज इराण – इस्रायल – अमेरिका यांच्यामध्ये चाललेल्या युद्धाचे परिणाम जगाला भोगावे लागत आहेत. भारतात देखील याची झळ बसली आहे. देशात एल.पी.जी. चा तुटवडा निर्माण झाला आहे. भविष्यात इंधनाचा तुटवडा निर्माण होऊन महागाई वाढण्याचा तुटवडा देखील वाढण्याची शक्यता असते. या युद्धामुळे अनेक निष्पाप जीवांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. शिवाय दोन्ही राष्ट्रांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. आज देखील अनेक राष्ट्रे एकमेकांचे शत्रू आहेत. यामध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन देशांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. दोन देशांमध्ये युद्धस्थिती कोणत्याही क्षणी निर्माण होऊ शकते. यासाठी प्रत्येक देशाला नेहमी सज्ज रहावे लागते. प्रत्येक देशाला आपल्या सुरक्षा यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. “वसुधैव कुटुंबकम्” या एका मंत्रामुळे हे सगळं थांबून सुरक्षा यंत्रणेवर होणारा खर्च देशाच्या विकासकामांसाठी वापरता येईल. जगातील प्रत्येक राष्ट्रांमध्ये इतर राष्ट्रांबद्दल एकोप्याची भावना निर्माण होईल. पण त्या राष्ट्रांचा एकत्रित विकास होऊन सगळीच राष्ट्रे गुण्यागोविंदाने नांदतील…
युद्ध हे सगळ्या समस्यांचे निराकरण करू होऊ शकत नाही – गुरू परुळेकर
आज जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे का आहे? किंवा प्रत्येक दिवशी जगात कुठे ना कुठे युद्ध अथवा युद्धजन्य स्थिती होत आहे याचे कारण भौतिकते गाठलेला परमोच्च बिंदू.
यामध्ये काही गोष्टी प्रकर्षाने जाणवून येतील. शस्त्र निर्माण करणाऱ्या राष्ट्रांना आपल्याकडे असलेली जुनी शस्त्रे दारूगोळा हा संपवायचा आहे. त्यामुळे या शस्त्रास्त्रांचा आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करून विक्री व्यवहार होत असतात. जगातील आर्थिक व्यवस्था ही खनिज घटकांच्या व्यापारावर, नैसर्गिक साधनसंपत्तीच्या साठ्यावर निर्भर आहे. जगातील बहुतांश इंधन साठा हा आखाती देश, अमेरिका, आफ्रिका, रशिया या खंडप्राय देशांमध्येच आहे. उर्वरित सर्व जगाला या देशातून निर्यात होणाऱ्या खनिज तेल व वायू यांच्यावर आधारित राहावे लागते.
अमेरिका हे जगातील साम्राज्यवादी राष्ट्र असून भौतिक विकासाच्या भस्मासुरी विकृतीने ग्रासलेले राष्ट्र आहे.
या सर्व भोगवादामुळे जगातील बऱ्याच राष्ट्रांना सैन्य यंत्रणा निर्माण करून त्यावरती प्रचंड खर्च करावा लागतो. युद्धजन्य परिस्थिती किंवा आतंकवाद सदृश्य परिस्थितीमुळे अस्थिरता निर्माण होते. यामध्ये अमेरिकेसारखे राष्ट्र जगातील सर्व विकसनशील राष्ट्रांच्या आर्थिक-व्यवस्थेत सामाजिक रचनेत ढवळाढवळ करण्याचा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करते. मुळात अमेरिके सारख्या राष्ट्रात गरिबी, दैन्य, व्यसनाधीनता आहे. परंतु अमेरिकेला जगाची काळजी असल्याचा दिखावा ते करतात.


Subscribe







