माजी आमदार वैभव नाईक यांचे आवाहन
१२ मार्च रोजी ओरोस येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
कुडाळ : आंबा आणि काजूची नुकसानभरपाई मिळावी यासाठी सिंधुदुर्गात १२ मार्च रोजी आंबा आणि काजू बागायतदारांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार असून या अनुषंगाने आज कुडाळ तालुका आंबा-काजू बागायतदारांची बैठक पार पडली. या बैठकीला माजी आमदार वैभव नाईक यांची मुख्य उपस्थिती होती. त्यांनी उपस्थित बागायतदारांना मार्गदर्शन केले. या मोर्चास कुडाळ तालुक्यातून मोठ्या संख्येने बागायतदार उपस्थित राहावे, असे आवाहन माजी आमदार वैभव नाईक यांनी केले.
कृषी विभागाने ९० टक्के आंबा-काजू पिकाचे नुकसान झाल्याचा अहवाल सादर केला आहे. आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून यात शासनाने बागायतदारांसाठी तरतूद करावी.
याप्रश्नी खासदार आणि पालकमंत्री यांनीही प्रयत्न करावेत, अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.
तसेच बागायतदारांना नुकसान भरपाई न मिळाल्यास शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखून धरण्याचा इशारा दिला असून त्याला आपला पाठिंबा असल्याचे माजी आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केले. या आंबा-काजू बागायतदार बैठकीस विजय प्रभू, जिल्हा परिषद सदस्य रूपेश पावसकर, जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर, उप जिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, अभय शिरसाट, अतुल बंगे, राजन नाईक, योगेश धुरी यांच्यासहित कुडाळ तालुक्यातील बागायतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Subscribe









