दोनच दिवसांत गाण्याने ओलांडला १ मिलियन व्ह्यूजचा टप्पा
कृष्ण मुरारी, सुंदरा, दर्याचं पाणी आणि लई भारी दिसते पोर अशा हिट गाण्यांनंतर आता साईरत्न एंटरटेनमेंट प्रॉडक्शनचे “तुरु तुरू” हे नवीन गाणे सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे प्रदर्शित झाल्यापासून अवघ्या दोनच दिवसांत या गाण्याने १ मिलियन (१० लाख) व्ह्यूजचा टप्पा यशस्वीपणे पार केला असून रसिक प्रेक्षकांनी या गाण्याला डोक्यावर घेतले आहे.
फ्रेश जोडी आणि सुमधूर आवाज
या गाण्याच्या निमित्ताने बिग बॉस फेम अभिनेता आयुष संजीव आणि लोकप्रिय अभिनेत्री हेमल इंगळे ही एक नवी आणि फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. गायिका सई गोडबोले, गायक निहार शेंबेकर आणि शार्क यांच्या सुमधूर आवाजाने या गाण्यात जीव ओतला आहे. प्रसिद्ध संगीतकार निहार शेंबेकर आणि शार्क यांनीच या गाण्याला संगीतबद्ध केले असून, विकास साटम यांनी या गाण्याचे शब्द लिहिले आहेत. तेजस नेरुरकर यांच्या दिग्दर्शनाखाली हे गाणे चित्रित झाले असून, पूजा काळे यांनी नृत्य दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
मराठीतील पहिलाच प्रयोग: बायले फंक जॉनर
गाण्याचे संगीतकार निहार शेंबेकर यांनी या गाण्याच्या वेगळेपणाबद्दल सांगितले की, “मराठीतील हे पहिलेच गाणे आहे जे आफ्रिकन रिदममधील ‘बायले फंक’ (Baile Funk) या जॉनरवर आधारित आहे. हेमल इंगळेला सई गोडबोलेचा आवाज इतका अचूक जुळला आहे की, पाहताना हेमल स्वतः गात असल्याचा भास होतो. या गाण्यावर प्रेक्षक नक्कीच थिरकतील याची आम्हाला खात्री होती.”
अभिनेत्री हेमल इंगळेने मानले आभार
आपल्या भावना व्यक्त करताना अभिनेत्री हेमल इंगळे म्हणाली, “साईरत्न एंटरटेनमेंटने मला या गाण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. दोन दिवसांत मिळालेल्या या प्रतिसादामुळे मी खूप भारावून गेले आहे. प्रेक्षकांनी या गाण्यावर जास्तीत जास्त रील्स बनवावे आणि मला टॅग करावे, असे आवाहनही तिने यावेळी केले.”
सध्या लग्नसराई आणि उत्सवांचे वातावरण असल्याने ‘तुरु तुरू’ हे गाणे प्रत्येक पार्टी आणि सोहळ्याची शान बनताना दिसत आहे.



Subscribe










