शिवप्रेमींकडून ३० दिवस श्रध्दांजली अर्पण करण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग : स्वधर्म आणि स्वराज्यासाठी अमानुष यातना सोसूनही औरंगजेबाच्या अटी धुडकावून लावणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान काळ आजपासून (१८ फेब्रुवारी) सुरू होत आहे. या बलिदानाची स्मृती म्हणून राजमाता जिजाऊ चौक येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘धर्मवीर बलिदान मास’ पाळण्यात येणार असल्याची माहिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.
अतुलनीय बलिदानाचा इतिहास
फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या या ३० दिवसांच्या काळात औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांसमोर तीन अटी ठेवल्या होत्या. यात धर्मपरिवर्तन करणे, स्वराज्याचा लूटलेला खजिना कुठे आहे ते सांगणे आणि स्वराज्यातील फितूर कोण आहेत यांची माहिती देणे, अशा अटींचा समावेश होता. मात्र, स्वराज्याच्या धाकल्या धनींनी या अटी मान्य न केल्यामुळे त्यांना ३० दिवस नरक यातना देऊन मारण्यात आले. या सर्वोच्च बलिदानाच्या स्मृती प्रित्यर्थ शिवप्रेमी ३० दिवसांचे सुतक पाळून महाराजांना श्रद्धांजली अर्पण करतात.
दररोज सायंकाळी ७ वाजता कार्यक्रम
१८ फेब्रुवारी ते १८ मार्च या महिनाभराच्या काळात दररोज सायंकाळी ७ वाजता राजमाता जिजाऊ आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात येणार आहे. त्यानंतर ७ वाजता बरोबर ‘ध्येय मंत्र’ आणि ‘प्रेरणा मंत्र’ म्हणून सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली जाईल.
शिवप्रेमींचे जाहीर आवाहन
“आज आपल्या दारात तुळस आहे ती राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या बलिदानामुळेच आहे. त्यांचे हे अनंत उपकार आणि ऋण फेडण्यासाठी प्रत्येक हिंदू बांधवाने आणि शिवप्रेमीने उद्यापासून वेळेवर उपस्थित राहावे,” असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.


Subscribe








