१९९० ते २०२६: सिंधुदुर्गच्या प्रगतीचा ‘राणे पॅटर्न’; दरडोई उत्पन्न २.६० लाखांवर
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत ‘विकास’ हाच निवडणुकीचा मुख्य अजेंडा!
-सी-वर्ल्ड’साठी माझी जिद्द कायम आहे…
-तरुणांना कोकणातच रोजगार, उद्योजकता वाढविण्यासाठी माझे सतत प्रयत्न
‘जनतेने मला कधीच अंतर दिले नाही
३५ वर्षांच्या अतूट नात्यावर खा. नारायण राणे यांनी व्यक्त केली कृतज्ञता
आजवर कोकणची जनता माझ्या पाठीशी उभी राहिली आहे. विरोधक जरी सातत्याने विकासाला आणि मला विरोध करत असले तरीही जनतेने मात्र, मला कधीच अंतर दिले नाही. माझ्यावर १९९० पासून आजवर विश्वासच ठेवला आहे. विकास कोण करू शकतो हे जनतेला माहिती असल्यामुळे निवडणूक कोणतीही असली तरीही त्या प्रत्येक निवडणुकीत कोकणची, सिंधुदुर्गची जनता माझ्या विकासाच्या विचारासोबत राहिली. सिंधुदुर्गात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे गट), राष्ट्रवादी कॉग्रेस (अजित पवार गट) ही महायुतीच जिंकेल. निश्चितपणे चांगलं यश मिळेल, असा ठाम विश्वास महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांनी दै.प्रहार आणि प्रहार डिजीटलशी बोलताना व्यक्त केला.
कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक होत आहे. या संदर्भाने खा.नारायण राणे यांची विशेष मुलाखत प्रहारसाठी घेतली. मोबाईलवर संवाद साधला असता खा.राणे कोकणातील विकास, निवडणुका आणि विरोधकांचे विरोधी राजकारण यावर त्यांच्या खास राणे शैलीत बोलले.
दादा, १९९० पासून कोकणच्या राजकारणात आपण आलात. गेली २७ वर्षे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत आपल्या विचारांची सत्ता राहिली आहे. काय सांगाल?
खा. नारायण राणे म्हणाले, खरं आहे. १९९० साली कोकणच्या राजकारणात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने मी विधानसभा निवडणूक लढवली. ती निवडणूक जनतेच्या विश्वासाने जिंकली. तिथपासून आजपर्यंत नेहमीच निवडणुकीत यश मिळत गेलं. महाराष्ट्रामध्ये यापूर्वीच्या निवडणुकीत भाजपा शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) यश मिळवत आली आहे. आतापर्यंतच्या निवडणुकीत देशात, राज्यात भाजपा महायुतीने घवघवीत यश मिळवले आहे. सिंधुदुर्गातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही विरोधी पक्षाचे अस्तित्व संपत आले आहे. कोणी उमेदवारही सापडत नाहीत,अशी स्थिती आहे. मी जनतेच्या विश्वासाच्या बळावर पक्षाला नेहमी निवडणुका जिंकून दिलेल्या आहेत.
दादा, निवडणुकीतील यशामागचे नेमकं रहस्य काय?
असे विचारता खा. नारायण राणे म्हणाले, अहो, गेल्या ३५ वर्षांत कोकणच्या विकासात झालेला बदल, केलेली प्रगती लोकांसमोर आहे. १९९० पूर्वीचा सिंधुदुर्ग आणि आजचा सिंधुदुर्ग हा सर्व बदल जनतेसमोर आहे. रस्ते, पाणी, वीज मुलभूत गरजांबरोबर जिल्ह्यात शिक्षण, आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. कोकणच्या सर्वांगीण विकासाचा विचार नजरेसमोर ठेवूनच मी काम केलं. कोकणातील बदलेलं चित्र लोकांसमोर असल्याने जनतेची मला साथही मिळत गेली. यामुळे मला सहावेळा आमदार आणि एकवेळा खासदार म्हणून जनतेने निवडून दिले. जनतेने मला निवडून दिल्याने कोकणचा विकास मला करता आला. दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून तसे प्रयत्न करण्यात आले. आज दहावी, बारावीच्या परीक्षेत कोकणचे विद्यार्थी अव्वलस्थानी असतात हे पाहून निश्चितच मला आनंद होतो. शैक्षणिक क्षेत्रातही इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, पदवी अभ्यास या शैक्षणिक सुविधा उपलब्ध होऊ शकल्या. या जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय प्रमाणे खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातूनही सेवा उपलब्ध झाली आहे. सिंधुदुर्गातही रूग्णांसाठी चांगली सेवा उपलब्ध झाली आहे. सर्वांगीण विकासाचा मुद्दा अधिक विस्ताराने सांगता असताना खा.राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली अनेक वर्षे चौपदरी महामार्गासाठी तसेच विमानतळ व्हावा यासाठी केंद्र व राज्यसरकारकडे सातत्याने मागणी केली जात होती. केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने चौपदरी रस्ता आणि विमानतळ दिला. विमानसेवेतही सुधारणा घडण्यासाठी आजही प्रयत्न होत आहेत. त्यामुळे विकासाला वेगळी चालना मिळत आहे. २५ हजारवर असलेले सिंधुदुर्गचे दरडोई उत्पन्न २ लाख ६० हजारावर गेले आहे. जिल्ह्यात पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी सुरक्षा यंत्रणेला आवश्यक त्या सोईसुविधा राज्यसरकारने पुरवल्या आहेत. यामुळे पोलीसांना काम करणे अधिक सुलभ झालं आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यात यश मिळालं आहे.
खा.नारायण राणे यांनी या मुलाखती दरम्यान पाणीटंचाईच्या मुद्दयावर बोलताना सांगितले की, ३० वर्षांपूर्वी जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई होती. मी मुख्यमंत्री असताना टँकरमुक्त सिंधुदुर्ग करण्याचा निर्धार केला आणि त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेची विशेषत: महिलांची पाण्यासाठी असलेली वणवण थांबली. जिल्ह्यात मोठे, मध्यम, लहान धरणांची कामे सुरू केली. ती पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. सिंधुदुर्गातील जनतेने जी साथ दिली आहे. त्यामुळेच सिंधुदुर्गचा विकास आणि प्रगती करता आली आहे.
दादा, कोकणातील तरूण आजही शहरांकडे जात आहे. त्यांना कसे थांबवणार?
खा. नारायण राणे म्हणाले, खरं आहे. कोकणात शिकलेला तरूण पुणे, मुंबईसारख्या शहरांकडे जात आहे. कोकणातील ग्रामीण भागातील घरेही बंद आहेत. गावातला तरूण गावातच राहिला पाहिजे. यासाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात स्वयंरोजगार आणि उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आडाळी एमआयडीसीमध्ये केंद्र आणि राज्यसरकारच्या माध्यमातून उद्योगांची उभारणी केली जाणार आहे. उद्योजकांना वीज, पाणी, जमीन याची उपलब्धता करून देऊन बेरोजगारीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचा प्रयत्न आहे. यापुढील काळात कोणत्याही उद्योगांना विरोध न करता कोणच्या विकासाला चालना कशी मिळेल, असे आमचे प्रयत्न राहतील.
दादा, आपण देशातला सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा निर्माण केला. पण…
खा.नारायण राणे- होय, हे खरं आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून राज्यसरकारने घोषित केला. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाजूच्या रत्नागिरी जिल्ह्यातही अनेक पर्यटनस्थळे आहेत. या पर्यटनस्थळांच्या माध्यमातून विकास करण्याचा एका वेगळ्या मार्गाने आपण प्रयत्न करत आहोत. म्हणून सी-वर्ल्डसारखा प्रकल्प सिंधुदुर्गात निर्माण करून जगातील पर्यटकांना जिल्ह्यात आणण्याचा माझा प्रयत्न होता. परंतु, ज्यांना विकासापेक्षा विरोधच करायचा असतो त्यांनी विकासाला अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु सी-वर्ल्ड प्रकल्पासाठीचे माझे प्रयत्न सुरूच राहतील. सिंधुदुर्गात गोवा आणि सिंगापूरच्या धर्तीवर विकास प्रकल्प राबवून पर्यटन विकासाला अधिक गती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती कशा पद्धतीने होऊ शकते हे सिंगापूरसारख्या देशाकडे पाहिल्यावर लक्षात येते. आता कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला नवीन रेल्वे मार्गाने जोडला जाणार आहे. साहजिकच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडणाऱ्या या रेल्वेमार्गाने कोकणच्या विकासाला निश्चितपणे गती मिळणार आहे. कोकणचा विकास कोणालाही थांबवता येणार नाही. प्रगती रोखता येणार नाही.
कोकण हा माझा ‘विकपाईंट’ आहे. तो माझा श्वास आहे. मी कोकणच्या विकासाचा ध्यास घेऊनच काम करत आहे. यामुळेच माझ्या कोकणच्या जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. आणि म्हणूनच या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत सिंधुदुर्गातील जनता महायुतीच्या उमेदवारांनाच विजयी करेल, असा विश्वासही खा.नारायण राणे यांनी व्यक्त केला.
बंडखोरी खपवून घेणार नाही
सिंधुदुर्गात भारतीय जनता पक्ष, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काग्रेस (अजित पवार गट) या महायुतीतील घटक पक्षांच्या अधिकृत उमेदवारांनाच जनतेने निवडून द्यावे. कोणीही बंडखोरी केली असेल अपक्ष असेल तर त्या कोणालाही महायुतीचा पाठींबा नाही. कोणाचीही बंडखोरी आम्ही खपवून घेणार नाही. महायुतीमध्ये जे ठरलंय, जो उमेदवार दिलेला आहे तोच उमेदवार मतदारांनी निवडून द्यावा. कोणाही अपक्षाला माझा पाठींबा नाही. राणे दुहेरी भूमिका घेत नाहीत. जे एकदा ठरलं त्याचीच अंमलबजावणी आम्ही करतो, असे खा.राणे यांनी स्पष्ट केले.
विरोधक अस्तित्वहीन, महायुतीच जिंकणार
यावेळच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत विरोधी पक्ष कुठेच दिसत नाही. महाविकास आघाडीतील घटक पक्ष, उद्धव ठाकरेंची सेना अस्तित्वहीन झाली असल्याची टीका खा.राणे यांनी केली.
बिनविरोधमध्ये बाजी
बदललेल्या निवडणुकांबद्दल खा.राणे यांना प्रश्न विचारता ते म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत महायुतीचे २५ जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य बिनविरोध निवडून आले. राज्यात सिंधुदुर्गात महायुतीने बिनविरोध सदस्य निवडीत बाजी मारली आहे. या निवडणूक निकालानंतर महायुतीचे सर्वाधिक सदस्य निवडून येतील. विरोधक अस्तित्वालाही दिसणार नाहीत.


Subscribe






