१९ वर्षीय तरुणाचा मृत्यू
कणकवली: कणकवली तालुक्यातील बिडवाडी हायस्कूलजवळ सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. समोरून येणाऱ्या एसटी बसला पाहून दुचाकीस्वाराने अचानक ब्रेक लावल्याने दुचाकी घसरली (स्लिप झाली). या अपघातात एका १९ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य एक जण किरकोळ जखमी झाला आहे.
सुनील उर्फ पिंट्या मल्हारी भिसे (वय १९) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर या अपघातात दुचाकी चालक अरुण परमेश्वर शेंडगे (वय २१) हा किरकोळ जखमी झाला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी १० च्या सुमारास बिडवाडी हायस्कूल परिसरातून ही दुचाकी जात होती. यावेळी समोरून एसटी बस येत असल्याचे पाहून चालकाने अचानक ब्रेक लावला. अचानक लावलेल्या ब्रेकमुळे चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी रस्त्यावर वेगाने घसरली. या अपघातात दुचाकीवर असलेले दोघेही रस्त्यावर फेकले गेले.
स्थानिकांकडून तातडीने मदत
अपघात होताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना मदतीचा हात दिला. सुनील याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
या घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


Subscribe





