कुडाळ : पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम अँड आर्ट गॅलरीला प्राथमिक शाळांकडून जोरदार पसंती मिळत असून अनेक शाळा आपल्या शैक्षणिक सहली घेऊन या म्युझियमला भेटी देत आहे.
ठाकर आदिवासी कला अंगण म्युझियम मध्ये ठाकर आदिवासी समाजाच्या अनेक कलांचे जतन केले आहे. कळसूत्री बाहुल्या, लेदर पपेट्स, ठाकर समाजाची पारंपरिक वाद्ये या ठिकाणी पहायला मिळतात. एकंदरीत ठाकर आदिवासी समाजाचे प्रतिबिंब आपल्याला या म्युझियममध्ये पहायला मिळते.
ठाकर आदिवासी कलेबाबतची इत्यंभूत माहिती व सखोल अभ्यास या ठिकाणी करता येतो. त्यामुळे जिल्हाभरासह जिल्ह्याच्या बाहेरील प्राथमिक शाळा शैक्षणिक सहलींच्या निमित्ताने भेटी देत असतात. शिवाय प्राचीन आदिवासी संस्कृतीवर पी.एच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील या म्युझियमला भेटी दिल्या आहेत.
एकूणच सध्याच्या आधुनिक युगात शिवकालीन ठाकर संस्कृती जिवंत ठेवण्याचा प्रयत्न हे म्युझियम करत असून इतिहासाच्या पानात डोकावण्यासाठी प्रत्येकाने या म्युझियमला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन ठाकर आदिवासी कला आंगण अँड आर्ट गॅलरीचे संचालक चेतन गंगावणे यांनी केले आहे.





Subscribe









