विज्ञानप्रतिभेला सुवर्णमुकुट; सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात कु.पर्णिका हनुमंत नाईक हिचा प्रथम क्रमांक

सावंतवाडी : विज्ञान, सर्जनशीलता आणि आत्मनिर्भर भारताची स्वप्ने साकार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचा भव्य आविष्कार म्हणजे ३३ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२५–२६. शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मिलाग्रीस स्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी येथे दि. १७ व १८ डिसेंबर २०२५ रोजी हे प्रदर्शन उत्साहात पार पडले.विकसित व आत्मनिर्भर भारतासाठी STEM” या कालसुसंगत विषयावर आयोजित या प्रदर्शनात जिल्ह्यातील शाळांमधून विज्ञानविषयक कल्पनांची रेलचेल पाहायला मिळाली. विद्यार्थ्यांच्या प्रयोगशीलतेला व्यासपीठ देणाऱ्या या प्रदर्शनात मूळ देवसू, सावंतवाडी येथील आणि आता कुडाळ येथे वास्तव्यास असलेली कुडाळ हायस्कूल, कुडाळ प्रशालेची विद्यार्थिनी कु. पर्णिका हनुमंत नाईक हिने आपल्या प्रभावी मांडणी व आशयघन लेखनाच्या बळावर माध्यमिक गट – निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.

तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शिक्षण विभागातर्फे प्रशस्तिपत्र, आकर्षक स्मृतिचिन्ह व पदक प्रदान करून गौरव करण्यात आला. परीक्षकांनी तिच्या विचारांची स्पष्टता, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि विषयाशी असलेली समर्पक सांगड यांचे विशेष कौतुक केले.

या यशामागे शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन, शाळा प्रशासनाचे प्रोत्साहन,तसेच तिचे वडिल श्री.हनुमंत ऊर्फ सागर नाईक सर जे ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा‘ अभियानातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रथम क्रमांक प्राप्त शिवाजी विद्यालय, हिर्लोक,ता.कुडाळ या हायस्कूलमध्ये कार्यरत आहेत त्यांचे तीला विशेष मार्गदर्शन आणि विद्यार्थिनीची सातत्यपूर्ण मेहनत कारणीभूत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. कु. पार्णिकाच्या या उज्ज्वल यशामुळे कुडाळ हायस्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, शाळा परिसरात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विज्ञानातून स्वप्नांना दिशा आणि प्रतिभेला पंख देणारे हे प्रदर्शन अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरले.

error: Content is protected !!