कडेकोट पोलीस बंदोबस्त; दंगल नियंत्रण पथकाला पाचारण
कणकवली : युवतीच्या मृत्यूनंतर संतापलेल्या ग्रामस्थांनी त्या खासगी रूग्णालयाची तोडफोड केली. त्यामुळे रूग्णालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच दंगलनियंत्रक पथकालाही पाचारण करण्यात आले.
कासार्डे येथील युवती नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. तिच्या डोक्याच्या मागील बाजूला गाठ आली होती. दोन तासात किरकोळ ऑपरेशन केल्यानंतर रूग्ण घरी जाईल अशी हमी त्या डॉक्टरकडून देण्यात आली होती. त्यानुसार शस्त्रक्रिया देखील झाली. मात्र शस्त्रक्रियेनंतर युवतीची प्रकृती बिघडली. तिला रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या. तसेच रक्तस्त्राव थांबत नव्हता. त्यामुळे तिला अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी रूग्णालयात पाठविण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. रूग्णालयाबाहेर सुमारे एक हजार हून अधिक नागरिक गोळा झाले होते. त्यामुळे पोलीस बंदोबस्त देखील वाढविण्यात आला आहे.