प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या डिजिटल सेवेला सुरुवात;सभासद पाल्यांचा गुणगौरव संपन्न
सिंधुदुर्ग: सहकार आणि कोकण याचे नाते आता अधिक दृढ होत चालले असून प्राथमिक शिक्षक पतपेढी सभासदांच्या सोयीसाठी स्तुत्य उपक्रम राबवित आहेत. या पतपेढीचे कार्य कौतुकास्पद असून आता डिजिटल सेवेच्या माध्यमातून चांगल्या युगाला व चांगल्या सेवेला प्रारंभ केला आहे असे गौरवोद्गार जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी काढले.
सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्या.सिंधुदुर्गनगरी या संस्थेच्या वतीने ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित सभासद गुणवंत पाल्य गुणगौरव व कोअर बँकींग, सभासद ऍप अनावरण सोहळ्यात उदघाटक म्हणून उपस्थित राहून जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी सभासदांना मार्गदर्शन केले.पतपेढीचे अध्यक्ष चंद्रसेन पाताडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सॉफ्टएड कंपनीचे रिजनल मॅनेजर कृष्णात पोवार,पतपेढी उपाध्यक्ष महेंद्र पावसकर,संचालक संतोष मोरे,नारायण नाईक,विजय सावंत,संतोष राणे,ऋतुजा जंगले,संजय पवार,सीताराम लांबर,मंगेश कांबळी,सचिन बेर्डे,समीक्षा परब,तज्ज्ञ संचालक किशोर कदम,शिक्षक संघटना प्रतिनिधी तुषार आरोसकर,आप्पासाहेब हरमलकर,संदीप गोसावी,संजय शेडगे,मणीपाल राऊळ, सुशांत मर्गज,संतोष कुडाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मनीष दळवी यांनी पुढे बोलताना जिल्ह्याच्या विकासासाठी सहकारी संस्थांच्या माध्यमातून पैशाची देवाणघेवाण करावी कारण सहकारातला पैसा जिल्ह्यातील उदयोगधंद्यांत गुंतविला जातो.डिजिटल सेवेबरोबरच ए आय तंत्रज्ञान सुद्धा वापरावे असे सांगितले.तसेच प्राथमिक शिक्षक पतपेढी स्वतःच्या भांडवलातून संस्था चालविते हे अभिमानास्पद आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले.संस्थेचे अध्यक्ष चंद्रसेन पाताडे यांनी आपल्या भाषणातून संस्थेच्या चढत्या विकासाचा आलेख मांडला.सहकाराचे मूळ तत्व न सोडता आधुनिक तंत्रज्ञानाचा आपण स्वीकार करूया असे आवाहन केले.सभासद ऍप हे केवळ साधन नाही तर सहकाराचे भविष्य आहे असे सांगून सहकारातून समृद्धी साधण्यास सर्वांनी कटिबद्ध राहूया असे आवाहन केले.
कार्यक्रमात सॉफ्टएड कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ऍप बाबत सविस्तर माहिती दिली.सभासद पाल्यांतून शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ताधारक,दहावी व बारावी गुणवंत तसेच एम.पी.एस.सी.परीक्षा गुणवंत धारकांचा सत्कार करण्यात आला.सभासद ऍप चे अनावरण यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष महेंद्र पावसकर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनुराधा माईणकर यांनी केले.कार्यक्रमाचे संयोजन अकौंटट मनोज सावळ, अधीक्षक समीर नातू,संगणक तज्ज्ञ संदीप जांभळे तसेच सर्व कर्मचारी वृंद यांनी केले.



Subscribe









