मालवण – कुंभारमाठ ५ जण बुडाले

१६ वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू

४ जणांना वाचवण्यात यश

मालवण : कुंभारमाठ गोवेकरवाडी रस्त्यालगत असलेल्या एका जुन्या खाणीतील पाण्यात आंघोळीसाठी उतरलेले पाच जण बुडल्याची घटना सोमवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. यात एका सोळा वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू झाला आहे. तर चार जणांना वाचविण्यात यश आले आहे. यातील एका महिलेवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

दरम्यान येथील ग्रामस्थ डॉ. राहुल राजूरकर यांनी अन्वेशा अजित आचरेकर यांच्या अजित स्कुबा डायव्हिंग व रेहान स्कुबा डायविंग पथकास माहिती दिली. स्कुबा टीमने तात्काळ दाखल होत पाण्यात उतरून शोध घेतला असता बुडालेल्या मुलीचा मृतदेह सापडून आला. यावेळी उपस्थितांनी हळहळ व्यक्त केला.

याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती नुसार कुंभारमाठ गोवेकरवाडी येथील लोंढे यांच्याकडे दिवाळी सणात मुंबई विरार येथील ओळखीचे अंजली प्रकाश गुरव (वय-३०), गौरी प्रकाश गुरव (वय-१८), गौरव प्रकाश गुरव (वय-२१), करिश्मा सुनील पाटील (वय-१६), दुर्वेश रवींद्र पाटील (वय- ९) हे पाच जण आले होते. हे सर्वजण सोमवारी सायंकाळी गोवेकरवाडी रस्ता लगतच्या चिरेखाणीच्या पाण्यात आंघोळ करण्यासाठी उतरले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने हे सर्वजण पाण्यात बुडू लागले.

राहुल भिसे या तरुणाची पाण्यात उडी

त्या ठिकाणी आरडा ओरड सुरु होता. हा प्रकार रस्त्यावरून जाणाऱ्या राहुल भिसे या तरुणाला दिसताच त्याने तात्काळ पाण्यात उडी घेत बुडणाऱ्या महिलेसह अन्य तीन मुलांना वाचविले. मात्र यात करिश्मा पाटील ही पाण्यात बुडून बेपत्ता झाली. तीचा शोध लागला नाही.

अंजली गुरव रुग्णालयात दाखल

गंभीर स्थितीत असलेल्या अंजली गुरव हिला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करत तिला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तर अन्य तीन मुले सुखरूप आहेत.

या घटनेची माहिती मिळताच कुंभारमाठ पोलीस पाटील विठ्ठल बावकर, आनंदव्हाळ पोलीस पाटील दशरथ गोवेकर यांच्यासह सरपंच पूनम वाटेगावकर, मधुकर चव्हाण, विकास गोवेकर, भाई टेंबुलकर, सिद्धेश गावठे, बाबी चव्हाण, मनोज वाटेगांवकर यांसह अन्य ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच भाजपच्या शहराध्यक्ष अन्वेशा आचरेकर यांनी अजित स्कुबा डायव्हिंग आणि रेहान स्कुबा डायव्हिंगच्या टीमला मदतीसाठी पाठविले. योगेश पांचाळ, आजीम मुजावर यांनी शोध मोहीम दरम्यान, पाण्यात बुडून मृत्यू पावलेल्या करिश्मा पाटील हिचा मृतदेह बाहेर काढला.

error: Content is protected !!