खुनाचे कारण लवकरच उघडकीस येणार…
कणकवली: बेंगलोर (कर्नाटक) येथील रहिवासी श्रीनिवास रेड्डी (५३) यांच्या खून प्रकरणाला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा (एलसीबी) आणि कणकवली पोलिसांच्या पथकाने मोठी कलाटणी दिली आहे. या पथकांनी बेंगलोर गाठून उल्लेखनीय कामगिरी करत तीन संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. सोमवारी रात्रीच्या सुमारास तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना घेऊन कणकवली पोलीस कणकवलीच्या दिशेने रवाना झाले आहेत. हे तिघे आज मंगळवारी सायंकाळपर्यंत कणकवलीत पोहोचतील असा अंदाज आहे. दरम्यान, ही ‘मर्डर केस’ ‘हाय प्रोफाईल’ असून, आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे.
काय आहे प्रकरण?
श्रीनिवास रेड्डी यांचा खून झालेला मृतदेह चार दिवसांपूर्वी साळीस्ते येथे महामार्गाजवळ गणपती सान्याच्या पायरीवर आढळला होता. त्याच दिवशी, श्रीनिवास रेड्डी यांच्या आईच्या नावावर असलेली एक कार दोडामार्ग तालुक्यात बेवारस स्थितीत आढळली होती आणि त्या कारमध्ये रक्ताचे डागही आढळून आले होते. मृतदेह व कार यांचा ‘कनेक्शन’ स्पष्ट झाल्यानंतर एलसीबी आणि कणकवली पोलीस अशी दोन पथके तातडीने तपासासाठी बेंगलोरला रवाना झाली होती. गेले तीन दिवस ही पथके बेंगलोर येथे आरोपींचा कसून शोध घेत होती.
‘प्रॉपर्टी’च्या वादातून खून झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष
अखेरीस सोमवारी रात्रीच्या सुमारास एलसीबीच्या पथकाने या तीन संशयित आरोपींना बेंगलोरमध्ये गजाआड केले. आरोपी ताब्यात आल्यामुळे खुनाचे नेमके कारण लवकरच उघडकीस येईल. मात्र, सद्यस्थितीत पोलिसांनी हा खून ‘प्रॉपर्टी’च्या (मालमत्तेच्या) वादातूनच झाला असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढला आहे.
खुनाच्या जागेबद्दल पोलिसांचा अंदाज
पोलिसांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, श्रीनिवास रेड्डी यांचा खून साळीस्ते येथेच झाला असावा. संशयितांनी श्रीनिवास रेड्डी यांना ठार मारल्यानंतर त्यांचा मृतदेह साळीस्ते येथे टाकला आणि रेड्डी यांच्या ताब्यातील कार दोडामार्ग येथे सोडून तेथून पळ काढला असावा.
सध्या ताब्यात घेतलेल्या तिन्ही आरोपींना कणकवलीत आणल्यानंतर या गुन्ह्याचा सखोल तपास होईल आणि खुनाच्या कारणासह या प्रकरणातील इतर आरोपींची नावेही समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.


Subscribe









