भ्रष्ट कारभार करणाऱ्या “त्या” कर्मचाऱ्यांवर कारवाई कधी करणार?
प्रसाद गावडेंचा अधिष्ठातांना सवाल
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,सिंधुदुर्गमधील संशयास्पद निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आलेला होता. यामध्ये कमी दराने निविदा भरलेल्या निविदाकाराला अपात्र ठरवून चढ्या दराने निविदा भरलेल्या मर्जीतील ठेकेदाराला खरेदीचा ठेका देण्याचा डाव सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी उघडकीस आणला होता. अधिष्ठातांनी प्राथमिक चौकशीत सदरची निविदा प्रक्रिया संशयास्पद असल्याचे मान्य करत निविदा रद्द करण्याचे आदेश काढले आहेत. परंतु या संशयास्पद व बेकायदा निविदा प्रक्रियेस जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत कोणतीही प्रशासकीय कार्यवाही होत नसल्याने अधिष्ठातांच्या भूमिकेबाबत संशय निर्माण होत असल्याचा आरोप शिवसेना कामगार सेना जिल्हाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी पत्रातून करत अधिष्ठातांकडे दोषी कर्मचाऱ्यांवार कारवाईची मागणी पत्राद्वारे केली आहे. निविदा प्रक्रियेबाबत संशयास्पद कारभार सिद्ध झाला असेल तर सदर संशयास्पद कारभाराला कोणकोणते कर्मचारी जबाबदार आहेत याची प्रशासकीयदृष्ट्या दोष निश्चिती करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर वैद्यकीय संचनालयाकडून मेडिकल साहित्य खरेदी संदर्भात दिलेल्या पत्रात औषध निर्मात्याद्वारेच साहित्य खरेदी करण्याचे सूचना असताना देखील लिपिक संवर्गातील कर्मचारी खरेदी समितीला विश्वासात न घेता साहित्य खरेदीची निविदा काढतात यामागे मोठी आर्थिक देवाणघेवाण झालेली असून दोषींवर प्रशासकीय शिस्तभंगाची कारवाई होणे आवश्यक आहे. खरेदीपूर्वी अधिष्ठातांची परवानगी घेतली होती का? अधिष्ठतांनी परवानगी दिली असेल तर औषधनिर्माता व खरेदी समितीला विश्वासात न घेता परवानगी कोणत्या आधारावर देण्यात आली? कार्यालयीन सुट्टीच्या कालावधीत निविदा प्रक्रियेत फेरफार करण्यात आला तो नेमका कोणाच्या परवानगीने करण्यात आला? निविदा पूर्व बैठक का घेण्यात आलेली नाही? अल्प दरात निविदा भरलेल्या निविदाकाराला कशाच्या आधारावर अपात्र ठरविण्यात आले? असे असंख्य प्रश्न अनुत्तरीत राहत असून याची सखोल चौकशी होणे काळाची गरज आहे. प्राप्त माहितीनुसार अपात्र ठरविण्यात आलेल्या निविदा कार्याला विश्वासात घेऊन सदरची खरेदी यानंतर तुमच्या मार्फतच केली जाईल असे सेटलमेंट करून तक्रार मागे घेण्यासाठी प्रयत्न चालू असल्याची जोरदार चर्चा मेडिकल कॉलेजमध्ये ऐकिवात आहे. या संदर्भात अधिष्ठातांकडून दोषी कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाल्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जनतेच्या पैशांचा होणारा अपहार व भ्रष्टाचार विरोधात सिंधुदुर्ग वासियांचा आक्रोश व्यक्त करण्यासाठी आत्मक्लेष आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रसाद गावडे यांनी दिला आहे.


Subscribe










