तिलारी येथे सापडलेली कार त्यांच्या आईच्या नावावर
कणकवली : कणकवली तालुक्यातील साळीस्ते येथे सापडलेला मृतदेह बंगळूर येथील ५३ वर्षीय अविवाहित डॉक्टर श्रीनिवास रेड्डी यांचा असल्याचे नातेवाईकांनी आज कणकवलीत ओळखले. मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी तो बंगळूर येथे रवाना करण्यात आला आहे. मात्र, डॉ. रेड्डी यांच्या हत्येमागील नेमके कारण, त्यात कोणाचा सहभाग आहे आणि गुन्ह्याचे धागेदोरे याबाबत अद्याप पोलिसांना कोणतेही ठोस माहिती मिळालेली नाही. डॉ. रेड्डी यांचे जवळचे नातेवाईक खूप कमी असल्याने आणि त्यांचा मित्रपरिवार देखील अत्यल्प असल्याने पोलिसांच्या तपासात अडथळे येत आहेत. याशिवाय, तिलारी येथे सापडलेली त्यांची कार डॉ. रेड्डी यांच्या ८२ वर्षीय आईच्या नावावर आहे. आई आजारी असल्याने त्यांच्याकडूनही फारशी माहिती उपलब्ध झालेली नाही.
तपास बंगळूरकडे वळला:
या प्रकरणाच्या तपासासाठी बंगळूर येथे गेलेली कणकवली पोलिसांची दोन पथके परतल्यानंतर या घटनेवर अधिक प्रकाश पडण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, डॉ. रेड्डी हे गर्भश्रीमंत होते आणि त्यांची बंगळूर परिसरात मोठी मालमत्ता होती. त्यामुळे ही हत्या ‘प्रॉपर्टी’च्या वादातून झाली असावी असा प्राथमिक अंदाज पोलीस व्यक्त करत आहेत. सध्या कणकवली पोलिसांचे एक पथक तिलारी येथे कार दरीत टाकण्यामध्ये कोणाचा सहभाग होता तसेच साळीस्ते येथे मृतदेह आणून टाकण्यासाठी कोणत्या वाहनाचा आणि व्यक्तींचा सहभाग होता, याचा कसून तपास करत आहे. पोलिसांकडून तपासाबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे.














 
	

 Subscribe
Subscribe









