मागील वर्षी २ नोव्हेंबर २०२४, दीपावली पाडव्याच्या मंगलमुहूर्तावर सिंधुदर्पण या डिजिटल न्यूज चॅनेलची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. आणि पाहता पाहता हे स्वप्नवत वर्ष संपले, पण या एका वर्षात सिंधुदर्पणने सिंधुदुर्गाच्या माहितीविश्वात आपले ठसे उमटवले आहेत.
खरं सांगायचं तर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधीपासूनच अनेक नामांकित वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या आपले अधिराज्य गाजवत आहेत. एवढ्या बलाढ्य स्पर्धकांच्या उपस्थितीत आपला कितपत निभाव लागेल हा प्रश्न सुरुवातीला सर्वांच्या मनात होता. मात्र, दर्शक, वाचक, जाहिरातदार आणि हितचिंतक यांच्या अपार प्रेम, विश्वास आणि आशिर्वादामुळे सिंधुदर्पण आज कोकणवासियांच्या मनामनात स्थिरावला आहे जणू काही गळ्यातील ताईतच बनला आहे.
शनिवार, दिनांक २ नोव्हेंबर २०२४ रोजी दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर या अस्सल कोकणच्या लाल मातीचा सुगंध असलेल्या माध्यमाचा जन्म झाला. गेल्या एका वर्षात सिंधुदर्पणने कोकणातील शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रातील अनेक पैलूंवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला. कोकणातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे प्रामाणिक कार्य आमच्या लेखणीने केले.
सिंधुदर्पणच्या वेब पोर्टल, युट्यूब चॅनेल, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला वर्षभरात लाखो दर्शकांनी भेट दिली. विशेष म्हणजे, आमच्या ‘प्रतिबिंब’ या विशेष सदराला वाचकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं हे तुमच्या अपार प्रेम आणि आशीर्वादाचंच फलित आहे.
महाराष्ट्राच्या पर्यटनाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकणाच्या कुशीत एक वर्षापूर्वी एका छोट्या रोपट्याने उगम घेतला आणि आज हे रोपटं एक देखणं, फुलणारं झाड बनू लागलं आहे. याच्या वाढीचं खतपाणी म्हणजे तुम्हा सर्वांचे प्रोत्साहन, आपुलकी आणि आशिर्वाद.
परमेश्वराच्या कुंचल्यातून रेखाटलेला अद्भुत कलाविष्कार म्हणजे कोकण. हेच कोकण आज आपली जुनी कात टाकून नव्या विकासग्रंथाची नवी पानं लिहित आहे. या नव्या परिवर्तनाचे, प्रगतीचे आणि संघर्षाचे “प्रतिबिंब” सिंधु’दर्पण’च्या माध्यमातून दाखवण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला आहे.
अन्यायाविरुद्ध परखडपणे आणि असत्याला न घाबरता लिहिण्याची परंपरा सिंधुदर्पणने जोपासली आहे. पत्रकारितेच्या अथांग सागरात आम्हाला तरता आलं ते फक्त तुमच्या प्रेम, विश्वास आणि आत्मीयतेमुळेच.
आगामी काळातही सत्य, प्रामाणिकपणा आणि लोकहित हेच आमचे दिशा आणि ध्येय राहील. तुमचं प्रेम, साथ आणि आशीर्वाद असाच कायम लाभत राहो हीच अपेक्षा.
✒️ चिन्मय श्रीराम घोगळे
(संचालक – सिंधुदर्पण न्यूज चॅनेल)

Subscribe










