तोंडावर मास्क आणि हॅल्मेट घालून येणाऱ्या दुचाकी चालकाकडून फसवणूक
सावंतवाडी शहरातील प्रकार
सावंतवाडी : तोंडावर मास्क आणि हॅल्मेट घालून येणाऱ्या दुचाकी चालकाने शहरात भाजी विक्री करणाऱ्या ग्रामीण महिलांना खोट्या नोटा देवून फसवणूक केली आहे. गेले अनेक दिवस हा प्रकार सुरू आहे. संबधित नोटा या झेरॉक्स पेपरपासून बनविण्यात आलेल्या आहेत. रात्री साळगाव येथील सुजाता हळदणकर या ६० वर्षीय महिलेला त्याने ही नोट दिली. या प्रकाराबाबत सर्व विक्रेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून त्या दुचाकी चालकाच्या गाडी नंबरच्या सहाय्याने त्याचा शोध घ्यावा, अशी मागणी केली आहे.
याबाबत हळदणकर या महिलेने दिलेली अधिक माहिती अशी की, संबंधित दुचाकी चालक हा रात्रीच्यावेळी तोंडावर मास्क व त्यावर हॅल्मेट घालून खरेदीसाठी येतो. भाजी तसेच अन्य साहित्य खरेदी केल्यानंतर तो आपल्या हातातील पाचशे किंवा दोनशेची नोट देतो आणि निघून जातो. मात्र संबंधित व्यक्ती देत असलेल्या नोटा या बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. हा प्रकार गेला आठवडाभर सुरू आहे. त्यामुळे संबंधितचा शोध घ्यावा, अशी मागणी संबंधित महिलांनी केली आहे.