बांदा : अवजड वाहतुकीतील ट्रक चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. रवींदर सदबीर (वय ३७, रा. हरियाणा) असे मृताचे नाव आहे. इन्सुली येथे गणेश चतुर्थीच्या काळात त्याला पोलिसांकडून इन्सुली परिसरात धाब्यावर थांबविण्यातआले होते.
रवींदर हे एका खासगी कंपनीचा माल घेऊन ट्रकद्वारे वाहतूक करत होते. काल इन्सुली येथील राजपुरोहित ढाबा येथे त्यांचा ट्रक थांबविण्यात आला होता. त्यावेळी ट्रकमध्ये ते अत्यवस्थ अवस्थेत असल्याचे ढाब्यावर काम करणाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधून बांदा पोलीस ठाण्यात माहिती दिली.
त्यानंतर बांदा पोलिस कर्मचारी बी. बी. पालकर व होमगार्ड प्रवीण परब यांनी घटनास्थळी धाव घेत रवींदर यांना प्राथमिक आरोग्य केंद्र, बांदा येथे दाखल केले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, बांदा पोलिसांनी त्यांच्या हरियाणातील नातेवाईकांशी संपर्क साधला. नातेवाईक बांदा येथे आल्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. प्राथमिक पाहणीत रवींदर यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद बांदा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी नरेश कुडतरकर करीत आहेत













