कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरूच असून, आज पहाटे कुडाळ- पणदूर येथे एका मालवाहू ट्रकचा अपघात होता होता थोडक्यात वाचला. खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट रस्त्याच्या दुभाजकावर (डिव्हायडर) जाऊन आदळला. सुदैवाने ट्रक दुभाजकाच्या पलीकडे गेला नाही, अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता होती.
स्थानिक वाहनचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. विशेषतः कुडाळ-पणदूर परिसरात रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. याच खड्ड्यांमुळे अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत. आज पहाटे एक मालवाहू ट्रक गोव्याच्या दिशेने जात असताना खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट दुभाजकावर जाऊन थांबला.
या घटनेनंतर महामार्ग प्रशासनावर पुन्हा एकदा टीकेची झोड उठली आहे. वाहनचालकांकडून सातत्याने हे खड्डे लवकरात लवकर बुजविण्याची मागणी होत आहे. खराब रस्त्यांमुळे प्रवासाला विलंब लागत असून, अपघाताचा धोकाही वाढला आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.



Subscribe









