विलवडेत १२ लाखांचे दागिने, रोख लंपास
बांदा – गणेशोत्सवाच्या तयारीसाठी मूळ गावी तांबोळी येथे गेलेल्या कुटुंबाच्या विलवडे, टेंबवाडी येथील घरात अज्ञात चोरट्याने सुमारे १२ लाख रुपयांचे दागिने आणि १९ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. बांदा-दाणोली जिल्हा मार्गालगत दिवसाढवळ्या भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
विलवडे टेंबवाडी येथे विलास गणपत सावंत आणि सुभाष गणपत सावंत यांचे एकत्रित घर आहे. सुभाष सावंत आणि त्यांचे कुटुंब या घरात वास्तव्यास असून, गणेशोत्सवाच्या तयारीसाठी ते सकाळी १० वाजता तांबोळी येथे गेले होते. हीच संधी साधून चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप टिकावाने तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील दोन्ही कपाटे फोडून त्यातील सोन्याचा हार, मंगळसूत्र, कानातील कुडी व इतर दागिने, तसेच १९ हजार रुपयांची रोकड घेऊन पळ काढला.
सायंकाळी ४ च्या सुमारास सुभाष सावंत घरी परतल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. आत प्रवेश केल्यावर कपाटे फोडलेली आणि दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ शेजाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. सरपंच प्रकाश दळवी, माजी उपसभापती कृष्णा सावंत, पोलीस पाटील दीपक नाईक यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच बांदा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. बांदा उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे आणि त्यांचे सहकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे तसेच श्वान पथकानेही घटनास्थळी येऊन तपास सुरू केला आहे. पुढील तपास बांदा पोलीस करत आहेत.













