चालत्या दुचाकीवर अचानक फिट आली

कोलगाव येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

सावंतवाडी : कामावरून घरी परतत असताना धावत्या दुचाकीवर अचानक फिट आल्याने खाली पडून कोलगाव येथील २९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. किशोर मुकुंद मेजारी असे या मृत तरुणाचे नाव आहे.

ही घटना सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी येथील शिवसेना कार्यालयाजवळ घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, किशोर हा काल रात्री आपल्या कामावरून बाजाराच्या दिशेने दुचाकीने येत होता सावंतवाडीतील शिवसेना कार्यालयाजवळ पोहचला असताना, त्याला अचानक फिट आली. यामुळे त्याचा दुचाकीवरील ताबा सुटून तो रस्त्याच्या कडेला कोसळला. किशोर यांना हृदयविकार आणि फिट येण्याचा जुना त्रास होता, अशी माहिती समोर आली आहे.

किशोर रस्त्यावर पडल्याचे पाहून परिसरातील स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेतली आणि त्यांना उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. चव्हाण, पोलीस हवालदार महेश जाधव यांनी रुग्णालयात भेट दिली. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस हवालदार मंगेश शिंगाडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. किशोर याच्या निधनाने कोलगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!