बिग हिट मीडिया प्रस्तुत ‘पैलवान’ गाण्याचा संगीत अनावरण सोहळा जल्लोषात संपन्न, अभिनेता अंकित मोहन, अभिनेता भूषण शिवतारे, आणि बालकलाकार शंभूने लावली हजेरी !
सिने अभिनेता अंकित मोहन म्हणतोय ‘झालोया मी पैलवान….अख्या महाराष्ट्राची शान’, बिग हिट मीडिया प्रस्तुत ‘पैलवान’ गाणं प्रदर्शित!
हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या प्राचीन कुस्ती या खेळाचा उल्लेख अगदी रामायण, महाभारतात देखील आवर्जून केला जातो. कुस्ती हा शारीरिक ताकद, कौशल्य, धैर्य, बुद्धी आणि तांत्रिकतेचा एक उत्कृष्ट संगम आहे. भारतीय संस्कृती आणि इतिहासाचा एक अविभाज्य भाग असलेल्या या खेळाला भारतात सन्मानाचे स्थान आहे. कुस्तीच्या खेळातून भारतीय समाजात शौर्य, शिस्त, आणि निष्ठा यांचे मूल्य रुजवले गेले आहे. अश्याच आपल्या तांबड्या मातीतल्या खेळावर आधारीत बिग हिट मीडिया प्रस्तुत ‘पैलवान’ गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणं पाहून भारतीय कुस्तीचा सुवर्णकाळ अजूनही सुरू आहे आणि पुढील पिढ्या या खेळात नवीन यशाची शिखरे गाठतील याची खात्री पटते. हे गाणं भावनिक, रोमांचक, थरारक, प्रेरणादायी आहे. या गाण्यात अंकित मोहन सोबत भूषण शिवतारे, ८२ वर्षीय ज्येष्ठ हिंद केसरी दीनानाथ सिंग, शंभू आणि आयुष काळे झळकले आहेत. बालकलाकार शंभू याचे इन्स्टाग्रामवर २.५ मिलियन फॉलोअर्स आहेत. हे गाणं सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी गायलं असून ब्रम्हा यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे. तर या गाण्याची गीतरचना ब्रम्हा आणि भूषण विश्वनाथ यांनी केली आहे. या गण्याचं दिग्दर्शन मनीष महाजन याने केलं आहे. या गाण्याची निर्मिती हृतिक अनिल मनी आणि अनुष्का अविनाश सोलवट यांनी केली आहे. नुकताच या गाण्याचा संगीत अनावरण सोहळा पुण्यात थाटामाटात पार पडला.
या गाण्याच्या संगीत अनावरण सोहळ्याला क्रीडाविश्वातील ज्ञानचंद पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू असलेले एम ओ वीचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री प्रदीप गंधे, एम ओ वीचे भारत तायक्वांदो-अध्यक्ष श्री.नामदेव शिरगावकर, ज्ञानचंद पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू/रेफरी आणि एम ओ वीचे – रोइंग कार्यकारी मंडळ सदस्य श्रीमती स्मिता शिरोळे, महाराष्ट्र ज्युदो असोसिएशन खजिनदार ॲड.धनंजय भोसले, जॉइंट सेक्रेटरी-ऑल इंडिया तसेच वुशू कार्यकारी मंडळ सदस्य श्री सोपान कटके, एम ओ वीचे कार्यकारी मंडळ सदस्य – रग्बी महाराष्ट्र क्रीडा फिजिओथेरपिस्ट डॉ.संदीप चौधरी आणि हिंदी मराठी चित्रपट सृष्टीमध्ये गेल्या अनेक दशकापासून कार्यरत असलेले अनिल मनी आणि माननीय मुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे खाजगी सचिव अविनाश सोलवट तसेच कलाकार विशाल फाळे, अनुश्री माने, विश्वास पाटिल, दिग्दर्शक अभिजीत दानी हे उपस्थित होते.
फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड अश्या मराठमोळ्या सिनेमांमध्ये आपल्या कलेने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता अंकित मोहन पैलवान गाण्याविषयी सांगतो, “मला असं वाटतं माझ्या नशिबातचं पैलवानाची भूमिका करणं होतं. मी बिग हिट मीडियाचे आभार मानतो. की त्यांनी मला पैलवान गाण्यात काम करण्याची संधी दिली. सेटवर सर्व कुस्तीपटूंसोबत शूट करताना एक सकारात्मक ऊर्जा मिळाली.” पुढे तो शूटींगचा एक किस्सा सांगताना म्हणाला, “गाण्याचं शूट ५ दिवस पुण्यात होतं. रेड अलर्ट असतानाही आम्ही तिथे शूट केलं. निसर्गाचा चमत्कार म्हणजे आम्ही इन डोअर शूट करताना पाऊस पडत होता. आणि आऊट डोअर शूट करताना २ दिवस सलग ऊन होतं. मला वाटतं देवाच्या मनात हे गाणं संपूर्ण शूट व्हावं असं होतं. सोशल मीडियावर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद पाहता हे गाणं लोकांच्या मनावर अधिराज्य करेल हे निश्चित आहे.”
शिवरायांचा छावा, रांगडा, सुभेदार अश्या सिनेमांमधील अभिनेता भूषण शिवतारे गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगतो, “तांबड्या मातीतला अस्सल रांगडा खेळ मी लहानपणापासून खेळतो. मी स्वत: पैलवान आहे. आपल्या तांबड्या मातीतले रांगडे पैलवान कसे आहेत हे या गाण्यामार्फत दर्शवले आहे. बिग हिट मीडिया टीमने मला या गाण्याविषयी विचारलं तेव्हा मला अत्यंत आनंद झाला. मी ज्या खेळात पारंगत आहे तीच कुस्तीवीराची भूमिका माझ्या वाट्याला आली. यातच मला समाधान आहे.
“निर्माता हृतिक अनिल मनी या गाण्याविषयी सांगतात, “महाराष्ट्राची संस्कृती तसेच आपल्या मातीतलं मराठमोळं लोकसंगीत जगभर पसरवण्यासाठी आम्ही विविध गाणी या रेकॉर्ड लेबलमार्फत प्रदर्शित करत आहोत. अभिनेता अंकित मोहन याने या गाण्यासाठी आपल्या फिटनेसवर संपूर्ण महिनाभर मेहनत केली आहे. तसेच पैलवान दिसण्यापेक्षा पैलवान कश्यापद्धतीने विचार करत असतील त्यांचं वागण बोलण या सर्वच गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला आहे. पैलवान गाण्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. असच प्रेम कायम राहो हिचं सदिच्छा !!”
निर्माती अनुष्का अविनाश सोलवट ‘बिग हिट मीडिया’च्या नव्या गाण्याविषयी सांगतात, “आम्ही मराठी संस्कृती गाण्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. आणि सोशल मीडियावरील प्रतिक्रिया पाहता मला खात्री आहे की ‘बिग हिट मीडिया’ रेकॉर्ड लेबल वरील ‘पैलवान’ आणि भविष्यातील सर्व गाणी प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरतील. तुमच असंच प्रेम आमच्यासोबत कायम राहू देत.