राजापूर – राजापूर तालुक्यातील केळवली गावचे रहिवासी, कै. केशव विठोबा हरयाण गुरुजी यांचे सुपुत्र डॉ. जगन्नाथ केशव हरयाण यांची दिल्ली नजीक असलेल्या प्रकाश आयुर्वेद मेडिकल कॉलेज अॅण्ड रिसर्च सेंटर (Prakash Ayurveda Medical College and Research Centre) मध्ये प्राचार्य (Principal) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. जगन्नाथ हरयाण ( एम.डी आयुर्वेद, पीएचडी स्कॉलर)हे आयुर्वेद क्षेत्रातील एक अनुभवी शिक्षक व प्रशासक असून त्यांनी आपल्या कार्याने विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक प्रेरणा निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रातील अभ्यास, निष्ठा व नेतृत्वगुण यामुळे त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.
त्यांची पत्नी देखील डॉ. तेजस्विनी जगन्नाथ हरयाण ( एम.एस.आयुर्वेद, पीएचडी स्कॉलर ) या याच संस्थेच्या शल्यतंत्र (Shalya Tantra) विभागात Associate Professor म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण केळवली येथे झाले तर जुनिअर कॉलेज खारेपाटण येथे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. संपूर्ण देश पातळीवरील प्रवेश परीक्षेमध्ये देशात 13 वा क्रमांक पटकावून तिरुपती येथील श्री. वेंकटेश्वर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज येथे विद्यावेतन ( styfund )घेऊन एमडी शिक्षण येथे पूर्ण केले. ऑल इंडिया नेट परीक्षेत पात्र होऊन पीएचडी करत आहेत.
ते खारेपाटण हायस्कूलमधील शिक्षक श्री. लक्ष्मीकांत हरयाण यांचे कनिष्ठ बंधू आहेत. आपल्या या यशाचे संपूर्ण श्रेय ते आपल्या आई-वडीलांच्या, कुटुंबीयांच्या प्रेरणा व सहकार्याला देतात, असे त्यांनी नम्रपणे सांगितले. त्यांच्या या निवडीबद्दल गावकरी, शिक्षकवर्ग, सहकारी आणि मित्र परिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.













