कारीवडे येथे कार-दुचाकींना उडवले
घटनास्थळी पोलीस उशिराने दाखल
आंबोली सावंतवाडी वाहतूक ठप्प
आंबोली-सावंतवाडी राज्यमार्गावरील कारीवडे-पेडवेवाडी येथे आज रात्री भीषण अपघात घडला आहे. चिऱ्यांची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने एका ब्रेझा कारसह दोन दुचाकींना धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
नेमके काय घडले?
चंदगड येथे राहणारा समीर सय्यद हा आपल्या ताब्यातील चिऱ्याचा ट्रक घेऊन चंदगडच्या दिशेने जात होता. रात्री साडेनऊच्या सुमारास तो कारीवडे-पेडवेवाडी येथील बाजारपेठेत पोहोचला. त्याचवेळी अचानक ट्रकचे ब्रेक लागले नाहीत. त्यामुळे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि त्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाड्यांना जोरदार धडक दिली.
या अपघातात बेळगाव येथील सुजाराम माळी यांच्या ब्रेझा कारचे तसेच स्थानिक दीपक कारवडेकर आणि मूसाफिर हसमी (रा. उत्तर प्रदेश) यांच्या दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.
ग्रामस्थांची पोलिसांवर नाराजी
अपघाताचा मोठा आवाज ऐकून आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थ तात्काळ घटनास्थळी धावले. त्यांनी मदतकार्य सुरू केले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, अपघाताची माहिती देऊनही पोलीस उशिरापर्यंत घटनास्थळी पोहोचले नाहीत, यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जर हा ट्रक दुकानात घुसला असता, तर मोठी जीवितहानी झाली असती, असे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. सध्या अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरच असल्याने आंबोली-सावंतवाडी मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.













