अज्ञात वाहनाची दुचाकीस्वाराला पाठीमागून धडक

दुचाकीस्वार कोसळला खाईत

मळगाव येथील घटना

सावंतवाडी : गोवा येथून कामावरून घरी परतत असताना दुचाकीला पाठीमागून अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरून ओहोळालगत खाली खाईत कोसळल्याने दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाला. मुंबई गोवा महामार्गावरील झाराप पत्रादेवी बायपासवर मळगाव बादेवाडी येथे शनिवारी रात्री ९ च्या सुमारास हा अपघात झाला. राकेश महादेव साळुंखे (२९, रा. माड्याचीवाडी, कुडाळ) असे जखमीचे नाव आहे.

दरम्यान, अपघाता वेळी त्याच्या पाठीमागून येणारे दुचाकीस्वार श्यामसुंदर सातार्डेकर (रा. मळगाव रेडकरवाडी) यांनी त्याला खाली पडल्याचे पाहिले. त्यांनी आजूबाजूच्या लोकांना त्याबद्दल माहिती दिली. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थ संजय जोशी, बबन नाईक यांनी खाली उतरून त्याला सुखरूपपणे वर काढले.

यावेळी मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर, स्थानिक ग्रामस्थ दीपक जोशी, गोट्या नाईक, प्रथमेश मांजरेकर, शामू जोशी, शिवम जोशी, बंडया मांजरेकर, झिलू गांवकर, गणेश जोशी, बाबू गावकर, शैलेंद्र पेडणेकर, श्याम सुंदर सातार्डेकर यांनीही मदत कार्यात सहभाग घेतला.

याबाबतची खबर मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर यांनी सावंतवाडी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सरपंच हनुमंत पेडणेकर यांनी १०८ रुग्णवाहिकेला संपर्क केला. मात्र, रुग्णवाहिका वेळेत दाखल न झाल्याने अखेर खाजगी वाहनातून जखमीला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

झाराप पत्रादेवी बायपासवर मळगाव बादेवाडी येथे पुलावर डांबरीकरण करण्यात आले आहे. इतर रस्त्याचे काँक्रिटीकरण अलीकडेच करण्यात आले आहे. या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळेच या खड्ड्यामुळे दुचाकीस्वार राकेश यांनी आपल्या दुचाकीचा वेग कमी केला त्यावेळी पाठीमागून वेगात येणाऱ्या अज्ञात चार चाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातानंतर ते खाली फेकले गेले. मात्र या दरम्यान धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाने पोबारा केल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. अपघाताबाबत उशिरापर्यंत पोलिसात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.

ब्रिजवर पडलेल्या या खड्ड्यांसंदर्भात सरपंच हनुमंत पेडणेकर यांनी वेळोवेळी महामार्ग प्राधिकरण तसेच संबंधित ठेकेदाराला कल्पना देऊन देखील त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केला आहे. त्यामुळे या ठिकाणी वरचेवर अपघात होत आहेत. या अपघातांना महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदार कंपनीत जबाबदार असल्याचा आरोप सरपंच हनुमंत पेडणेकर यांनी केला असून याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली आहे अन्यथा याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

error: Content is protected !!