कुडाळ : कुडाळ बस डेपो येथे १० रुपयांच्या शिल्लक पैशांवरून झालेल्या वादानंतर एका प्रवाशाने एसटी बसच्या वाहकाला मारहाण केली. यात वाहकाच्या डोक्याला दुखापत झाली असून, त्याच्यावर कुडाळ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-पणजी (व्हाया कोल्हापूर) या मार्गावर धावणाऱ्या एमएच १४-एक्यू ५९३८ या क्रमांकाच्या एसटी बसचे वाहक किरण लक्ष्मण देवकुळे (वय ४६, रा. कोल्हापूर) हे होते. कोल्हापूरहून राधानगरी मार्गे कणकवलीला प्रवासी घेऊन ही बस कुडाळ डेपोत आली. यावेळी गुंडू सखाराम नाईक (रा. वेतोरे, वेंगुर्ले) या प्रवाशाचा आणि वाहक किरण देवकुळे यांचा १० रुपये शिल्लक देण्यावरून वाद झाला.
या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या झटापटीत वाहक किरण देवकुळे यांच्या डोक्याला मार लागला. त्यांना तातडीने कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेचा अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल गवस करत आहेत.